पिंपरी-चिंचवड: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा एकदा पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेवर सत्ता मिळवून देण्याचा चंग कार्यकर्त्यांनी बांधला आहे. २०१७ मध्ये जो पराभव झाला त्याचा वचपा काढण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी सज्ज झाली आहे. २०१७ मध्ये झालेल्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत १२८ जागांपैकी केवळ ३६ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. आता ती परिस्थिती बदलण्यासाठी अजित पवारांनी देखील कंबर कसली आहे.

उद्या (शनिवारी) अजित पवारांचा पिंपरी-चिंचवड शहरात जनसंवाद असणार आहे. यानिमित्ताने शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघणार असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळेल अस बोललं जातं आहे. एकीकडे भाजपकडून स्वबळाचा नारा दिला गेला असून शत प्रतिशत भाजप अस शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे यांनी देखील अजित पवारांना पुन्हा एकदा सत्ता मिळवून द्यायची असल्याचा निर्धार केला आहे.

बहुतांश ठिकाणी त्या-त्या ठिकाणची पक्षाची ताकद बघून महायुती की स्वबळावर याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर नेते घेणार असल्याच सांगितलं जातं आहे. अस असलं तरी पिंपरी- चिंचवड शहरावर असलेलं प्रेम आणि २०१७ मध्ये हातातून निसटलेली महानगर पालिका पुन्हा मिळवण्यासाठी अजित पवारांना स्वतः मैदानात उतरावं लागलं आहे. अजित गव्हाणे यांच्यानंतर योगेश बहल यांच्याकडे देण्यात आलेले शहराध्यक्ष पदानंतर शहरातील राजकीय परिस्थिती बदलेल अस बोललं जातं होत.

परंतु, परिस्थिती जैसे थे आहे. शहराध्यक्ष यांनी अद्याप राष्ट्रवादी पक्षाची कार्यकारिणी जाहीर केलेली नाही. स्थानिक महायुतीमधील शीतयुद्ध सर्वांना परिचित आहे. भाजपचे चार आमदार असल्यानेच की काय आमदार अण्णा बनसोडे यांना उपाध्यक्ष पद देऊन राष्ट्रवादीने आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेवर तब्बल १५ वर्षे निर्विवाद राष्ट्रवादीची सत्ता होती. ती पुन्हा मिळवण्यासाठी राष्ट्रवादीला मास्टर स्ट्रोक ची गरज आहे. अजित पवारांनी अनेकदा आपल्या भाषणांमध्ये महानगरपालिका निवडणुकीत पिंपरी- चिंचवडच्या जनतेने नाकारल्याने खंत बोलून दाखवलेली आहे. पिंपरी- चिंचवडची जनता अजित पवारांना स्वीकारते का? हे आगामी काळात कळेलच. परंतु, त्याआधी महायुती की स्वबळावर याकडे भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच लक्ष लागलं आहे. स्थानिक पातळीवर स्वबळाचा दोन्हीकडून नारा देण्यात आला आहे. अस असलं तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार काय निर्णय घेतात ते बघणं महत्वाचं आहे.