पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने एप्रिल २०२५ पासून कागदविरहित प्रशासनाकडे वाटचाल सुरू केली आहे. कामकाजात दस्तऐवज व्यवस्थापन प्रणाली ( डीएमएस) आणि कार्यप्रवाह प्रणाली (डब्ल्यूएफ) वापरली जात आहे. एक एप्रिलपासून ३१ हजारांहून अधिक कागदपत्रे, तीन हजार ७१६ नस्तीचे कामकाज डिजिटल पद्धतीने पूर्ण केले आहे. त्यामुळे महापालिकेचे संपूर्ण कामकाज डिजिटल झाले आहे.
महापालिकेच्या सर्व ५४ विभागांमध्ये आता एकही नस्ती मानवी हस्तक्षेपाने तयार केली जात नाही. नस्ती तयार करण्यासाठी दस्तऐवज व्यवस्थापन आणि कार्यप्रवाह प्रणालीचा वापर केला जात आहे. या प्रणालीचा वापर करून सर्व कागदपत्रांचे स्कॅनिंग, ट्रॅकिंग, सामायीकरण व शोध घेणे शक्य झाले आहे. तर, कार्यप्रवाह प्रणालीमुळे प्रत्येक नस्तीचे कामकाज वेळेत पूर्ण होत असून, वेळेची बचत होत असल्याचा दावा माहिती व तंत्रज्ञान विभागाने केला आहे. प्रशासनाचे कामकाज पूर्णतः डिजिटल झाल्यामुळे निर्णयप्रक्रिया, पारदर्शकता व जबाबदारीत लक्षणीय वाढ झाली आहे. या प्रणालींच्या वापरामुळे स्मार्ट प्रशासन, पारदर्शक कामकाज या दिशेने वाटचाल सुरू असून महापालिकेच्या सेवासुविधा नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचवण्यास देखील मदत होऊ लागल्याचाही विभागाचा दावा आहे.
महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांचे वेतन व ठेकेदारांची देयके काढण्यासाठी ‘सॅप’ प्रणालीचा वापर केला जात आहे. मार्च व एप्रिलमध्ये सहा हजार ५०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे वेतन व ठेकेदारांची देयके या प्रणालीद्वारे काढण्यात आली आहेत. अभियांत्रिकी विभागांनी ‘सॅप’ प्रणालीवर १७६ अंदाजपत्रके तयार केली आहेत. विवाह नोंदणी, क्रीडा मैदाने व सभागृह बुकिंग, झोपडपट्टी बिलिंग यांसारख्या नागरी सेवादेखील डिजिटल झाल्या आहेत.
डिजिटल कामकाजाचा फायदा
५४ विभागांमध्ये शंभर टक्के कागदविरहित कामकाज, जीआयएस आधारित ईआरपी, ‘सिंगल साइन इन’ प्रणाली आणि एकत्रित डॅशबोर्डमुळे प्रत्येक नस्तीची माहिती मिळविणे शक्य झाले आहे. ई-ऑफिस प्रणालीद्वारे आठ हजार ७४२ ई-मेल पाठवण्यात आले आहेत. एक हजार ७०९ डिजिटल स्वाक्षरी ‘की’ तयार करण्यात आल्या आहेत.
महापालिकेच्या कोणत्याही विभागात आता मानवी हस्तक्षेपाने नस्ती पाठवण्याची गरज राहिलेली नाही. संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात करण्यात आले आहे. यामुळे प्रशासनातील कामकाजाची गती, पारदर्शकता वाढली आहे. या यंत्रणेमध्ये वापरकर्त्यांच्या अभिप्रायावरून सुधारणादेखील केल्या जात आहेत.- शेखर सिंह,आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका