पिंपरी : विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये संतुलित व आरोग्यदायी आहाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये ‘पोषण आहार’ उपक्रम राबवण्यात येत आहे. एक सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या उपक्रमाला पालक व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दररोज खाऊमध्ये वेगवेगळे पदार्थ विद्यार्थ्यांना दिले जात असून १५ ऑक्टोबरपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे.
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकापुरते ज्ञान न देता प्रत्यक्ष अनुभवातून आरोग्य आणि पोषणाचे धडे देण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. खाद्यपदार्थांचे अंकुरित धान्य, आंबवलेले पदार्थ, पोषक पदार्थ, नाश्ता व उपवासाचे पदार्थ, ज्वारी-बाजरी व इतर धान्याचे पदार्थ, फळांचा दिवस असे गट करून त्यानुसार विद्यार्थ्यांचा प्रत्येक दिवसाचा आहार ठरविण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रथिने, फायबर, खनिजयुक्त धान्यांचे महत्त्व व जीवनसत्त्वांचे महत्त्व सांगण्यात येत आहे. आंबवलेल्या पदार्थांमुळे पोषणमूल्य कसे वाढते? पचन कसे सुधारते? याबाबत माहिती दिली जात आहे.
विद्यार्थ्यांना कार्बोहायड्रेट, प्रथिने, मेद, जीवनसत्त्वे व खनिजे या पाच प्रमुख अन्नघटकांबद्दल माहिती दिली जात आहे. तसेच आरोग्यासाठी पाण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात येत आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांना आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळविणारा एक शैक्षणिक अनुभव ठरत असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.
आहारामध्ये कोणते पदार्थ?
अंकुरित धान्यात मूग, मटकी, हरभरा यांचे पौष्टिक पदार्थ. आंबवलेल्या पदार्थांमध्ये इडली, सांबार, अप्पम. पोषक पदार्थांमध्ये पालक, मेथी यांचा समावेश असलेले पराठे, धिरडे, थालिपीठ. नाश्ता व उपवासाच्या पदार्थांमध्ये पोहे, उपमा, शिरा, साबुदाणा वडे, खिचडी, भाकरी, नाचणी व तांदळाचे पदार्थ, सफरचंद, द्राक्षे, चिकू, संत्री यांसारखी हंगामी फळे, पदार्थांचा आहारामध्ये समावेश आहे.
महापालिकेच्या शाळांमधून राबवण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचे आरोग्यच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांमध्येही सकारात्मक संदेश पोहोचतो. संतुलित आहार व योग्य पोषण हीच मुलांच्या सर्वांगीण विकासाची खरी पायरी आहे, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील म्हणाले.
आरोग्यदायी आहार हीच मुलांच्या निरोगी भविष्याची गुरुकिल्ली आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना लहान वयात योग्य आहाराचे महत्त्व समजते. त्यांचा शारीरिक तसेच मानसिक विकास घडतो, असे सहायक आयुक्त किरणकुमार मोरे यांनी सांगितले.