पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील सहआरोपी नीलेश चव्हाण याला नेपाळ सीमेवर अटक करण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना शुक्रवारी यश आले. त्याने पुण्याहून रायगड, दिल्ली, गोरखपूर आणि तेथून नेपाळ गाठल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

चव्हाण पोलिसांच्या हाती लागत नव्हता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी ‘लूक आउट’ नोटीस जारी केली होती. तरीही तो हाती लागत नसल्याने त्याची मालमत्ता जप्त करण्यासाठी न्यायालयाकडून ‘स्टॅण्डिंग वॉरंट’ही जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. अखेर शुक्रवारी त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात २४ मे रोजी कलम वाढ करून नीलेश चव्हाण यालाही सहआरोपी केले. वैष्णवी यांच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला. तसेच, वैष्णवी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे दहा महिन्यांचे बाळ चव्हाण याच्याकडे असताना कस्पटे कुटुंबीय त्याच्याकडे बाळ आणण्यासाठी गेले असता, त्यांना चव्हाण याने पिस्तूलचा धाक दाखवून धमकाविले होते. त्या प्रकरणातही वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल केला.

हे गुन्हे दाखल झाल्यापासून चव्हाण पसार होता. सात दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. पिंपरी-चिंचवड पोलीस दलाची सहा पथके त्याच्या मागावर होती. चव्हाण हा नेपाळ सीमेवर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सायबर पोलिसांच्या मदतीने पोलीस तेथे पोहोचले. चव्हाण हा भारतीय मोबाइल किंवा सिम कार्ड वापरत नव्हता. यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचणे अशक्य झाले होते. तो नेपाळमधील सिम कार्डद्वारे इंटरनेट वापरत असे. तो एकटाच राहत होता, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिली. चव्हाणकडे चौकशी केल्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत, हे स्पष्ट होईल, असे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड म्हणाले.

रायगडमार्गे नेपाळला

गुन्हा दाखल झाल्यापासून चव्हाण पोलिसांच्या हातावर तुरी देत फिरत होता. सुरुवातीला तो पुण्यातून रायगड येथे गेला. तेथून दिल्लीला गेला. त्यानंतर दिल्ली, गोरखपूरमार्गे सौनौली, भैरावाह येथून नेपाळ सीमेवरील काठमांडू असा प्रवास करीत तो गेला. त्यानंतर तो भैरावाह येथून उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील सौनौली येथे आला. त्याची माहिती मागावर असलेल्या पोलीस पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेपाळ सीमेवर उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथून नीलेश चव्हाणला ताब्यात घेतले आहे. त्याला गोरखपूर येथून विमानाने पुण्यात मध्यरात्री आणले जाणार आहे. संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा