पुण्याच्या चाकण परिसरात गॅस टँकरमधून गॅसची चोरी करणाऱ्या तिघांना सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या. यात गॅस टँकरचे वाहन चालक देखील सहभागी असल्याचं समोर आलं. या कारवाईत एकूण १ कोटी १० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा पथकाने केली. आरोपी दररोज दोन्ही गॅस टँकरमधून २०-२५ सिलेंडर गॅस काढून घेत असे आणि तो काळ्या बाजारात कमी किंमतीला विकत असे. या मोबदल्यात गॅस टँकर चालकांना एका गॅस टाकीमागे 600 रुपये मिळत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नरसिंग दत्तू फड, अमोल गोविंद मुंडे अशी आरोपी गॅस टँकर चालकांची नावे आहेत. काळ्या बाजारात कमी किंमतीत गॅस विकणाऱ्या आरोपीचे नाव राजू बबन चव्हाण आहे. यापैकी दोन्ही चालक हे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील असल्याचे समोर आले आहे. 

रायगडवरून खेडला गॅसची वाहतूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरसिंग आणि अमोल हे दोघे गॅस टँकरवर चालक म्हणून काम करत होते. ते दररोज खेड परिसरातील एका नामांकित कंपनीला एल. पी. जी. गॅसचा पुरवठा करायचे. रायगड जिल्ह्यातील उरण येथून भरलेले दोन्ही टँकर ते खेड येथील कंपनीत रिकामा करायचे.

काळ्या बाजारात आरोपींची प्रत्येक गॅस सिलेंडरमागे ६०० रुपये कमाई

दरम्यान, त्यांना कंपनीच्या शेजारी राहणारा व्यक्ती म्हणजे राजू बबन चव्हाण हा भेटला. त्याने त्यांना पैसे कसे कमवायचे हे पटवून सांगत आपण टँकरमधून गॅस सिलेंडरमध्ये भरून तो विकायचा. एका भरलेल्या गॅस सिलेंडरमागे ६०० रुपये दिले जातील असं त्यांने दोघांना सांगितले. त्याप्रमाणे दररोज, मध्यरात्री उरण येथून भरलेला गॅस टँकर ते चाकण – शिक्रापूर रोड परिसरात थांबवायचे. तिथे दोन्ही टँकरमधून २०-२५ गॅस सिलेंडर कनेक्टरच्या साहाय्याने भरून घ्यायचे. यातून त्यांना चांगले पैसे मिळत असे.

गॅसची चोरीसाठी आरोपींकडून भन्नाट युक्ती, ऐकून पोलीसही अवाक

आपण गॅस काढून घेतला आहे हे न समजण्यासाठी आरोपी चालक हे उरण येथे गॅस भरत असताना गॅस टँकरमध्ये डिझेल कमी ठेवायचे अन ज्या वेळी गॅस काढून घेतला जायचा तेव्हा तेवढ्याच वजनाचे डिझेल भरायचे. यामुळे संबंधित कंपनीला गॅसची चोरी केल्याचे कळून येत नव्हते.

हेही वाचा : माथेरानमध्ये महिलेचा डोकं नसलेला निर्वस्त्र मृतदेह, पोलिसांकडून २४ तासात गुन्ह्याचा छडा, हत्येचं कारण ऐकून पोलीसही अवाक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखेर, याबाबतची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार चाकण – शिक्रापूर रोड परिसरात आरोपींना टँकरमधून गॅस काढून घेत असताना रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी केली.