पिंपरी : मद्य पिण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळी झाडण्यात आली. ही घटना बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिरंगुट येथील सावकारवाडी भागात घडली.
ओंकार ऊर्फ सनी गोळे असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी सागर ऊर्फ ऋषिकेश संभाजी गोळे (३१) आणि महेश तानाजी कदम (२४, दोघेही रा. पिरंगुट, ता. मुळशी) यांना अटक केली असून त्यांच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याक आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अनिल बत्तिशे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार आरोपींनी आपसांत संगनमत करून सनी गोळे याच्याशी मद्य पिण्याच्या कारणावरून वाद घातला. शिवीगाळ केली. दरम्यान एका आरोपीने ‘पिरंगुटमध्ये फक्त माझीच चालणार’ असे म्हणत त्याच्या ताब्यातील गावठी कट्ट्यातून गोळी सनी गोळे याच्यावर झाडली. सनीच्या उजव्या बाजूला गोळी लागली. बावधन पोलीस तपास करत आहेत.
म्हाळुंगे एमआयडीसीत दहा लाखांचे मेफेड्रॉन जप्त
म्हाळुंगे एमआयडीसी परिसरात पोलिसांनी कारवाई करून नऊ लाख ८४ हजार रुपयांचा मेफेड्रॉन (एम.डी.) अमली पदार्थ जप्त केला. याप्रकरणी तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (१० नोव्हेंबर) मध्यरात्री मोई गावाच्या हद्दीतील फलकेवस्ती परिसरात करण्यात आली. इम्तियाज अहमद खान (३२), फैसल नवाज चौधरी (२५, मोई, ता. खेड) आणि मोहम्मद मुस्तफा शेख (२५, वडाळा, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट चारमधील पोलीस शिपाई सांगर जैनक यांनी याबाबत म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या तीन आरोपींकडून नऊ लाख ८४ हजार ७०० रुपयांचा ७९ ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ सापडला. अटक केलेल्या आरोपींनी हे मेफेड्रोन दोघांकडून विक्रीसाठी आणल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
पतसंस्थेत पाच कोटींचा गैरव्यवहार
चिंचवड येथील एका कर्मचारी सहकारी पतपेढीमध्ये ठेवीदारांच्या रकमेतील चार कोटी ९० लाख ७८ हजार १४० रुपयांचा अपहार करण्यात आला. याप्रकरणी पतपेढीच्या व्यवस्थापकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ५५ वर्षीय व्यक्तीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पतपेढीचे व्यवस्थापक असताना २००७ ते २०२५ या कालावधीत ठेवीदारांकडून घेतलेली तीन कोटी ८५ लाखांहून अधिक रक्कम परत न करता ती स्वतःच्या व पत्नीच्या नावावर वळवली. या अपहारामध्ये पतपेढीच्या माजी अध्यक्षांनी आरोपीस आर्थिक व्यवहारात मदत केली. आरोपींनी आपसांत संगनमत करून एकूण चार कोटी ९० लाख रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. हा गुन्हा चिंचवड पोलिसांकडून पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.
सौर प्रकल्पाच्या नावाखाली दीड कोटींची फसवणूक
तळेगाव दाभाडे येथील एका बँकेच्या शाखेतून सौर हायमास्ट आणि स्ट्रीटलाईट साहित्य पुरविण्याच्या नावाखाली दीड कोटी रुपये घेऊन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी ३५ वर्षीय व्यक्तीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून एका नावाने बँक खाते उघडून ग्रामपंचायतीच्या सौर प्रकल्पासाठी लागणारे साहित्य देण्याचे सांगितले. मात्र साहित्य न देता एक कोटी ५० लाख रुपयांची रक्कम स्वतःच्या खात्यावर घेतली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा
फिरायला जाण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एक तरुण आणि तरुणाच्या वडिलांना मारहाण करण्यात आली. ही घटना चिखलीतील पंतनगर कॉलनी येथे घडली. याप्रकरणी १८ वर्षीय तरुणाने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या वडिलांना आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. प्लास्टिकच्या पाइपने त्यांच्या डोक्यात मारहाण केली. फिर्यादीने मध्यस्थीचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. चिखली पोलीस तपास करत आहेत.
सफाई कर्मचाऱ्यास मारहाण; दोघांवर गुन्हा
कचरा गोळा करण्यासाठी थांबलेल्या दोन सफाई कर्मचारी यांनी डोक्यात लोखंडी सळईने मारहाण करण्यात आली. ही घटना रावेत येथे घडली. याप्रकरणी २६ वर्षीय कर्मचाऱ्याने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कचरा घेण्यासाठी रावेत गावठाण येथे थांबले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. लोखंडी सळईने फिर्यादीच्या डोक्यात फटका मारून जखमी केले. रावेत पोलीस तपास करत आहेत.
गुटखा विक्री प्रकरणी तरुणाला अटक
शासनाने बंदी घातलेल्या गुटखा, तंबाखू आणि पानमसाल्याचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई चिंचवड येथे करण्यात आली. स्वप्निल गुणवंत जाधव (३२, जिजामाता पार्क, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस हवालदार नरहरी सदाशिव नाणेकर (३७) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निलने शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून आपल्या मोटारीत गुटखा, तंबाखू व पानमसाला विक्रीसाठी ठेवला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात एक लाख १३ हजार २५० रुपयांचा प्रतिबंधित पदार्थ व आठ लाखांची मोटार असा एकूण नऊ लाख १३ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करत आहेत.
मटका जुगार अड्ड्यावर छापा; आठ जणांवर गुन्हा दाखल
मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकत आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (१० नोव्हेंबर) सायंकाळी चिंबळी गावाजवळील हापसेवस्ती भागात केली. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलीस हवालदार प्रविण प्रकाश कांबळे यांनी सोमवारी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेले हे आरोपी कल्याण बाजार मटका जुगार खेळताना रंगेहात पकडले गेले. त्यांच्याकडून ४० हजार रुपयांच्या जुगार साहित्यासह मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस करत आहेत.
