पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येसाठी भामा आसखेड धरणातून १६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आणण्याचे महापालिकेने हाती घेतलेले काम संथगतीने सुरू आहे. डिसेंबर २०२४ मध्ये काम पूर्ण करण्याचे नियोजन असताना अशुद्ध जलउपसा केंद्र, पंपिंग स्टेशन, जलवाहिनीची कामे अद्यापही सुरू आहेत. या कामासाठी देण्यात आलेली मुदत डिसेंबर महिन्यात संपणार असून, या मुदतीतही काम पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज महापालिका प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना दररोज पाणीपुरवठ्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
शहराच्या चारही बाजूंनी इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे शहराच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत असून, सद्य:स्थितीत लोकसंख्या ३० लाखांवर जाऊन पोहोचली आहे. वाढत्या लोकसंख्येला पवना व आंद्रा धरण योजनेचे तसेच, एमआयडीसीचे पाणी अपुरे पडत आहे. वाढीव पाणी उपलब्ध नसल्याने मागील सहा वर्षांपासून शहरात एकदिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहराची वाढती लोकसंख्या पाहता खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातील १६७ दशलक्ष लिटर पाणी आरक्षित केले. येथून पाणी आणण्यासाठी वाकीतर्फे वाडा येथील अशुद्ध जलउपसा केंद्रापासून तळेगाव दाभाडे एमआयडीसीतील नवलाख उंब्रे येथील ब्रेक प्रेशर टँकपर्यंत ७.३० किलोमीटर अंतराची १७०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येत आहे. तेथून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी नेण्यासाठी १८.८० किलोमीटर अंतर १४०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत केवळ ५५ टक्के काम झाले आहे.
जागा ताब्यात येण्यास व इतर तांत्रिक कारणांमुळे काम संथ गतीने सुरू आहे. धरण शंभर टक्के भरले असल्याने तेथे अशुद्ध जलउपसा केंद्राचे काम करताना अडचणी येत आहेत. स्थापत्यविषयक कामे, यंत्रसामग्रीची जोडणी, पंपिंग स्टेशन, विद्युतजोडणीची कामे करता येत नसल्याने ही योजना मुदतीत पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
शहराला दररोज होणारा पाणीपुरवठा
पवना धरण – ५५० दशलक्ष लिटर
आंद्रा धरण – ८० दशलक्ष लिटर
एमआयडीसी – २० दशलक्ष लिटर
एकूण – ६५० दशलक्ष लिटर
मुळशीतून पाण्याबाबत प्रतिसादाची प्रतीक्षा
शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन मुळशी धरणातून ७६० दशलक्ष लिटर पाणी आरक्षित करण्याची विनंती महापालिकेने जलसंपदा विभागाकडे २०२३ मध्ये केली होती. या मागणीस नकार देत राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याबाबत जलसंपदा विभागाने महापालिकेला कळविले होते. त्या संदर्भात जलसंपदा मंत्र्यांसोबत महापालिका व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. मात्र, मुळशी धरणातून पाणी देण्यास अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.
भामा आसखेड योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. धरणाजवळ अशुद्ध जलउपसा केंद्र, पंपिंग स्टेशनचे काम सुरू आहे. जलवाहिनीला येणारे अडथळे दूर करून काम पूर्णत्वास नेण्यात येत आहे. मुदतीमध्ये काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.– प्रमोद ओंभासे,मुख्य अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका