पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभागरचनेवर भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे वर्चस्व असल्याचे जाहीर झालेल्या अंतिम प्रभागरचनेवरून स्पष्ट झाले आहे. महायुतीमध्येच सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची प्रभाग रचनेत कोंडी केल्याचे दिसून येते. या पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम यांनी रचनेवर घेतलेल्या हरकती अमान्य केल्या आहेत. त्यामुळे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसला हा धक्का मानला जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची अंतिम प्रभागरचना सोमवारी जाहीर करण्यात आली. २०१७ प्रमाणे तयार केलेल्या प्रारूप प्रभागरचनेत काही बदल करण्यात आले. त्यात महायुतीमधील भाजप, शिवसेना (शिंदे) पक्षाचे वर्चस्व दिसून येत आहे. नैसर्गिक, भौगोलिक सीमांचे पालन केले नसल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हरकती घेतल्या होत्या. या पक्षाचे शहराध्यक्ष, माजी महापौर योगेश बहल, याच पक्षाच्या माजी महापौर मंगला कदम हे प्रतिनिधित्व करीत असलेले प्रभाग पूर्वीप्रमाणे करावेत, अशी हरकत नोंदविण्यात आली होती.
बहल यांचा संत तुकारामनगर, महात्मा फुलेनगर प्रभाग क्रमांक २० आणि कदम यांचा संभाजीनगर, मोरवाडी प्रभाग क्रमांक दहामध्ये संबंध नसलेला परिसर तसेच, झोपडपट्टी जोडण्यात आल्याचा आक्षेप होता. भौगोलिक दृष्टीने प्रभागातील अनेक परिसर एकमेकांशी पूरक नाहीत. त्यामुळे या दोन प्रभागांतील अतिरिक्त जोडलेला परिसर वगळावा, अशी हरकत घेतली होती.
प्रभाग दहाबाबत ११५ हरकती आणि प्रभाग २० संदर्भात ३१ हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. मात्र, अंतिम रचना करताना कोणताही बदल करण्यात आला नाही. केवळ प्रभाग दहाच्या नावामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला हा धक्का मानला जात आहे.
मागील वेळी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही नगरसेवक निवडून आलेल्या प्रभाग क्रमांक १२ रुपीनगर, तळवडे, त्रिवेणीनगरमध्ये प्रभाग क्रमांक एक चिखली गावठाणमधील ताम्हाणेवस्तीचा समावेश करण्यात आला. भाजपमधून शिवसेना (ठाकरे) पक्षात गेलेले माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी प्रतिनिधित्व केलेल्या भोसरीतील धावडेवस्ती, चक्रपाणी वसाहत प्रभाग क्रमांक सहामधून गावजत्रा मैदान व महापालिका रुग्णालय परिसर वगळण्यात आला. तो परिसर शीतलबाग, गव्हाणे वस्ती प्रभाग क्रमांक सातमध्ये जोडण्यात आला.
शिवसेना (शिंदे) पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे यांचे चिरंजीव विश्वजित निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या प्रभाग क्रमांक २४ दत्तनगर, पद्मजी पेपर मिल, गणेशनगरमधून म्हातोबा वस्ती वगळण्यात आली. तो भाग ताथवडे, वाकड प्रभाग क्रमांक २५ मध्ये समाविष्ट करण्यात आला. म्हातोबा वस्ती वगळल्याने अनुसूचित जाती (एससी)चे आरक्षण पडण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे शिवसेना (ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक सचिन भोसले यांची कोंडी झाल्याचे दिसते.
हरकतींची दखल घेतली नाही. अंतिम प्रभागरचनेत किरकोळ बदल केले आहेत. एखादा भाग कमी केला आहे. त्याची राष्ट्रवादी काँग्रेसला कोणतीही अडचण नाही. निवडणुकीसाठी आमची पूर्ण तयारी आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सांगितले.
प्रभागरचनेबाबत भाजपला कोणतीही अडचण नाही. रचनेवर भाजपचे वर्चस्व नाही. विरोधकांचे आरोप निराधार आहेत. भाजपची १२८ जागा लढविण्याची तयारी पूर्ण झाली असल्याचे भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले. महायुतीने काही प्रभाग फोडले आहेत. प्रभाग फोडाफोडीत भाजपचा वरचष्मा दिसत आहे. महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीला डावलण्यात आले आहे. प्रभाग रचना कशीही झाली, तरी महाविकास आघाडी संपूर्ण जागा लढविणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी सांगितले.