पिंपरी : शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार सुरु असताना आता बँक खाते, मोबाइल हॅक करून फसवणूक झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी (२३ सप्टेंबर) ऑनलाइन फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये एक कोटी ७१ लाख ६८ हजारांची फसवणूक झाली आहे.

ऑनलाइन स्टॉक ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून चिंचवडमधील एका व्यक्तीची ३३ लाख १२ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी संबंधित व्यक्तीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन महिलांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादींना समाजमाध्यमाद्वारे लिंक पाठविण्यात आली. फिर्यादीना दोन उपयोजन डाउनलोड करायला सांगण्यात आले. त्याद्वारे ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून फिर्यादींकडून विविध बँक खात्यांमध्ये ३३ लाख १२ हजार रुपये जमा केले. मात्र, गुंतवणुकीची रक्कम किंवा तिचा परतावा परत न देता फिर्यादीची फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिघीत ट्रेडिंगच्या नावाखाली ७४ लाखांची फसवणूक

दिघी येथे एका व्यक्तीची टेलीग्राम ॲपद्वारे बनावट खाते उघडून ७४ लाख ८३ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी ३८ वर्षीय युवकाने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादींना टेलिग्रामवरून अनोळखी व्यक्तींनी संपर्क साधला. त्यांनी फिर्यादीचे बनावट खाते उघडून त्यात जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून पैसे जमा करण्यास सांगितले. मात्र, जमा केलेले पैसे परत न देता त्यांची फसवणूक केली.

सांगवीत फसवणूक

ऑनलाइन गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची २५ लाख १९ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना सांगवीत घडली. या प्रकरणी ५५ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी फिर्यादीशी समाजमाध्यमातून संपर्क साधला. त्यांना कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर, फिर्यादीला एका समूहात जोडले. आरोपींनी वेळोवेळी खात्याचे तपशील देऊन शेअर बाजारात गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळवून देण्याचे आश्वासन दिले आणि ऑनलाइन २५ लाख १९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आळंदीत मोबाइल हॅक करून २४ लाखांची फसवणूक

मोबाइल हॅक करून बँक खात्यातून २४ लाख ३५ हजार ५८३ रुपये दुसऱ्या खात्यात वळवून वृद्धाची फसवणूक केल्याचा प्रकार आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. आरोपीने फिर्यादीचा मोबाइल हॅक केला. बँकेच्या खात्यातील ७० लाख रुपयांची मुद्दल आणि सहा लाख ६३ हजार ९१६ रुपयांचे व्याज फिर्यादीच्या बचत खात्यात वळविले. त्यानंतर फिर्यादीच्या खात्यातून २४ लाख ३५ हजार ५८३ रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वळविल्याचे पोलिसांनी सांगितले.

चाकणमध्ये दंडाची पीडीएफ फाइल पाठवून आठ लाखांची फसवणूक

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने झालेल्या दंडाची पीडीएफ फाइल पाठवून मोबाइल हॅक करून एकाची आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना चाकणमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी ४५ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या समाजमाध्यमातील व्हॉट्सअॅप मोबाइल क्रमांकावर अज्ञात व्यक्तीने एपीके फाइल पाठवली. ही फाइल उघडताच फिर्यादीचा मोबाइल हॅक झाला आणि बँक खात्यातून आठ लाख रुपये इतर खात्यात विळविले.

पिंपरीत तरुणीची ऑनलाइन फसवणूक

समाजमाध्यमाद्वारे टास्क देऊन एका तरुणीची सात लाख ६८ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना पिंपरीत घडली. संबंधित तरुणीने संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने फिर्यादीला एक लिंक पाठवून त्यांना सहभागी होण्यास सांगितले. टेलिग्राममध्ये सहभागी झाल्यानंतर फिर्यादीला वेगवेगळे टास्क दिले. या टास्कसाठी फिर्यादीला विविध बँक खात्यांवर आणि क्यूआर कोडवर पैसे भरण्यास सांगून त्यांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांचा पिंपरी-चिंचवड पोलीस तपास करत आहेत.