पिंपरी : ‘उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या कोरेगाव पार्क येथील कथित जमीन गैरव्यहार प्रकरणाशी भाजपचा संबंध नाही. या प्रकरणाची अद्याप चौकशी व्हायची आहे. पार्थ पवार यांचे किती समभाग आहेत, त्यांचे काय म्हणणे आहे, या सर्व बाबी चौकशीनंतर समोर येतील. या प्रकरणाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीशीही संबंध नाही,’ असे राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारपासून पिंपरी-चिंचवडमधील विधानसभा मतदारसंघांचा दौरा सुरु केला. तत्पूर्वी त्यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली. आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, आमदार उमा खापरे, माजी आमदार अश्विनी जगताप, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यावेळी उपस्थित होते.
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी पाटील यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ‘आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी पार्थ पवार यांच्या कंपनीचे जमीन खरेदीचे प्रकरण काढल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाची अद्याप चौकशी व्हायची आहे. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी सुरू आहे. गुन्हा दाखल झाला आहे.’
‘पिंपरीत संकरित युती’
महापालिका निवडणूक महायुती व्हावी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या सूचना आहेत. महायुती न झाल्यास संकरित युती (हायब्रीड) करुन लढावे. म्हणजे पिंपरीतील ३२ प्रभागांपैकी २२ प्रभागांमध्ये युती झाली. उर्वरित दहा प्रभागांमध्ये युती झाली नाही, तर तिथे मैत्रीपूर्ण लढत होईल. शक्य नाही, तिथे स्वबळावर लढले जाईल. महापालिका निवडणुकांमध्ये पक्षासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा असतो. त्यामुळे अधिकाधिक ठिकाणी युती आणि उर्वरित ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवा
शहरातील रस्त्यावर खड्डे मोठ्या प्रमाणात आहेत. त्याबाबतच्या तक्रारी सर्वाधिक आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात यावे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर द्यावा. फुटपाथ अतिक्रमणमुक्त राहतील, यासाठी सुयोग्य नियोजन करावे, अशा सूचनाही मंत्री पाटील यांनी दिल्या.
वाहतुकीचा नियोजन आराखडा करा
शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनसंख्या विचारात घेऊन भविष्यात शहरामध्ये वाहतूक कोंडीसारख्या समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी आगामी १५ वर्षांचा विचार करून महापालिकेने नियोजन आराखडा तयार करावा. तत्काळ उपाययोजनांसाठी पोलीस विभागाशी समन्वय साधून वाहतूक नियंत्रण दिवे (सिग्नल) दुरुस्तींसह वाहतूक नियोजनासाठी इतर उपाययोजना करण्यास प्राधान्य देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
