पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना खेड मधील वासुली फाटा येथे घडली. ओंकार परमेश्वर शिवले (१९, वाळुंज वस्ती, खेड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भागवत लक्ष्मण ठोंबरे (१८, कडूस, खेड), योगेश विक्रम साळवे (१९, करंज विहिरे, खेड) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचे मागील पंधरा दिवसांपूर्वी फिर्यादी यांच्या भावासोबत भांडण झाले होते. त्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी ओंकार यांना वासुली फाटा येथे बोलावून घेतले. ओंकार वासुली फाटा येथे गेले असता आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. यात ते गंभीर जखमी झाले आहे. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
शाळकरी मुलांच्या भांडणात धारदार शस्त्राने वार
शाळकरी मुलांमध्ये भांडण झाले. या भांडणात दोघांनी एका मुलावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना तळेगाव चाकण रोडवर घडली. याप्रकरणी ४६ वर्षीय व्यक्तीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एक अल्पवयीन मुलगा आणि एका अल्पवयीन मुलीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा रस्त्याने पायी चालत घरी जात होता. तळेगाव चाकण रोडवरील एका हॉटेल समोर आल्यानंतर त्याच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलगा आणि मुलीने त्याला रस्त्यात अडवले. त्याच्यावर धारदार शास्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.
पतसंस्थेत गुंतवणुकीच्या बहाण्याने २१ लाखांची फसवणूक
पतसंस्थेत गुंतवणुकीमध्ये चांगला परतावा देण्याच्या आमिषाने दोघांची २१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना आळंदी येथे घडली. याबाबत ४० वर्षीय व्यक्तीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना पतसंस्थेत फिक्स डिपॉझिट स्कीम आणि इतर गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी २६ लाख ५० हजार रुपये गुंतवणूक केली. त्यांपैकी आरोपींनी आठ लाख ५० हजार रुपये परत केले. उर्वरित १८ लाख आणि त्यावरील परतावा तसेच तीन लाख रुपये आणि त्यावरील परतावा परत न देता दोघांची एकूण २१ लाख रुपयांची फसवणूक केली. दिघी पोलीस तपास करत आहेत.
बांधकाम प्रकल्पावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू
बांधकाम प्रकल्पावरून पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना चऱ्होली बुद्रुक येथे घडली. दिनबंधू हरीराम ठाकूर असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी एका ३६ वर्षीय व्यक्तीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बांधकाम पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चऱ्होली बुद्रुक येथे एका महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तिथे ठाकूर काम करत होते. कामगारांना कोणत्याही सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याने ठाकूर हे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडले. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दिघी पोलीस तपास करत आहेत.
वेश्याव्यवसायातून चार महिलांची सुटका
वडमुखवाडी येथे पैशांचे आमिष दाखवून महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. या कारवाईमध्ये चार महिलांची सुटका करण्यात आली. ही कारवाई दिघी आळंदी रोड वडमुखवाडी येथील एका लॉजवर करण्यात आली. याप्रकरणी पोलीस शिपाई चंद्रकांत पारधी यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धर्मेंद्र श्रीराम मिलन वर्मा (वय २१, रा. हाती चौक, कात्रज, मूळ अयोध्या, उत्तरप्रदेश) याला अटक केली असून त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी चार महिलांना पैशांचे आमिष दाखवले. पैशांच्या आमिषातून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी लॉजवर कारवाई करत चार महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका केली आहे. दिघी पोलीस तपास करत आहेत.