पिंपरी : महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे वास्तव्यास असलेल्या पिंपरीतील कॅम्पामधील व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या पिंपरी मर्चंट फेडरेशनने महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे वाघेरे यांना धक्का बसला आहे.
पिंपरी कॅम्प ही पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात मोठी घाऊक व किरकोळ बाजारपेठ आहे. किराणा मालापासून दागिने, कपडे, खेळणी, गृहोपयोगी वस्तू, इलेक्ट्रीक साहित्य येथे मिळते. पिंपरीत सिंधी बांधवांचे मोठे वास्तव्य असून व्यापाऱ्यांची मोठी मते आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे हे पिंपरी कॅम्पलगत असलेल्या पिंपरीगावचे रहिवाशी आहेत. त्यांच्या पत्नी उषा वाघेरे यांनी पिंपरी कॅम्प परिसराचे पालिकेत प्रतिनिधित्व केले. त्यामुळे कॅम्पातील व्यापाऱ्यांचा वाघेरे यांना पाठिंबा राहील असे मानले जात होते. परंतु, व्यापाऱ्यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे.
पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी म्हणाले की, खासदार बारणे यांनी करोना काळात व्यापाऱ्यांना मदत केली. पिंपरी कॅम्पातील माथाडी कामगारांचा प्रश्न त्यांनी सोडवला. व्यापाऱ्यांच्या अडीअडचणींत ते सदैव पाठीशी असतात. त्यामुळे या निवडणुकीतही बारणे यांनाच पाठिंबा देण्याचा निर्णय व्यापारी बांधवांनी घेतला आहे.
पिंपरी कॅम्पला गावठाणाचा दर्जा देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून निवडणूक झाल्यानंतर त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. सिंधी बांधवांना निर्वासित सनद देण्याचा विषय लवकरच मार्गी लागेल, असे खासदार बारणे यांनी सांगितले.
हेही वाचा – बारामतीच्या निकालाची ‘खडकवासल्या’वर भिस्त!… अजित पवारांनी दिली कबुली
चुकीचे काम आपण कधी केले नाही आणि चुकीच्या कामाला कधी पाठीशी घातले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्षम नेतृत्व आणि आपण केलेले काम, सातत्याने ठेवलेला संपर्क या आधारे आपण मते मागत आहोत, असेही ते म्हणाले.