पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या वाहतूककोंडीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांच्या वेळेत दोन तासांनी वाढ केली. यापूर्वी सकाळी आठ ते ११ आणि सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत वाहनांना प्रवेशास मनाई होती. आता सकाळी आठ ते १२ आणि दुपारी चार ते रात्री नऊपर्यंत प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश वाहतूक विभागाचे उपायुक्त विवेक पाटील यांनी दिला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये चाकण, भोसरी, म्हाळुंगे, तळेगाव दाभाडे ही औद्योगिक क्षेत्रे असून, हिंजवडी, तळवडे आयटी पार्क आहे. श्रीक्षेत्र देहूगाव, आळंदी ही धार्मिक स्थळे असून, येथे वारकरी संप्रदायातील लोकांचा वर्षभर मोठ्या प्रमाणावर वावर असतो. आयुक्तालयांतर्गत मोठमोठ्या बाजारपेठा, शैक्षणिक संकुले, दवाखाने आहेत. शहरातून जुना मुंबई-पुणे, बंगळुरू-मुंबई व पुणे-नाशिक महामार्ग असे महत्त्वाचे महामार्ग जात आहेत. पिंपरी महापालिका भवन ते भक्ती-शक्ती दरम्यान विस्तारित मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. हिंजवडी येथे मेट्रोचे काम प्रगतिपथावर आहे. शहराचा विस्तार झपाट्याने होत असल्याने वाहतुकीच्या साधनांत वाढ होऊन वाहनांच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली आहे.
वाहतूककोंडी होऊ नये यासाठी अवजड वाहनांच्या वाहतुकीची वेळ निश्चित केली होती. काही ठिकाणी पूर्णवेळ प्रवेश बंदी करण्यात आली असून, काही ठिकाणी सकाळी आठ ते ११ आणि सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत अवजड वाहनांना प्रवेशास मनाई केली होती. त्यानंतरही अवजड वाहनांमुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. त्यामुळे प्रवेश बंदीच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. आता सकाळी आठ ते बारा आणि दुपारी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत अवजड वाहनांस प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.
कोणत्या वेळी मनाई?
- तळवडे, निगडी, चिंचवड, भोसरी, हिंजवडी, सांगवी, वाकड, बावधन, पिंपरी, देहूरोड विभागासह म्हाळुंगेतील ह्युंडाई सर्कल ते खालुंब्रेतील जाणे-येणे आणि चाकणमधील शिक्रापूर बाजूकडून चाकणमार्गे तळेगाव बाजूकडे जाण्यास व तळेगावकडून चाकणमार्गे शिक्रापूरकडे येण्यास सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना सकाळी आठ ते बारा आणि दुपारी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.
- भोसरी विभागातील वाहनांना सकाळी सात ते बारा व दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत आणि तळेगाव वाहतूक विभागात सकाळी सात ते दुपारी दोन आणि दुपारी चार ते सात वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेशास मनाई केली आहे.
तळवडे, दिघी, आळंदी विभागात अवजड वाहनांना पूर्णवेळ बंदी
दिघी, दिघी-आळंदी, तळवडे वाहतूक विभागात अवजड वाहनांना पूर्णवेळ वाहतूक बंदी करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे ट्रक, दुधाचे टँकर, सैन्य दलाच्या मोठ्या वाहनांना यातून वगळण्यात आले आहे.
अवजड वाहनांना प्रवेशास मनाई केल्यानंतरही कोंडीत फरक पडलेला नाही. त्यामुळे प्रवेश बंदीच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. – विवेक पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग.