वीज कंपनीची देयके भरायची आहेत, असे सांगून मोबाईल अद्ययावत करायला लावून इंटरनेटचा गैरवापर करून एका महिलेची १० लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सांगवीतील ५३ वर्षीय महिलेने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.

अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून या महिलेशी संपर्क साधला. वीज कंपनीची देयके भरायची आहेत. त्यासाठी मोबाईल अद्ययावत करायचा आहे. त्याकरिता क्विक सपोर्ट ॲप आणि एनी डेस्क ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. महिलेने तसे केल्यानंतर आरोपीने तिचा मोबाईल स्क्रीन शेअर करून इंटरनेटचा वापर करून महिलेच्या बँकेच्या खात्यातून १० लाख ३० हजार रूपये स्वत:कडे वळते करून घेतले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक सुनील तांबे पुढील तपास करत आहेत.