पिंपरी : तरुणीशी असलेल्या प्रेमसंबंधाचा राग मनात धरून तिच्या प्रियकराचा खून करण्यासाठी सराइत गुन्हेगारांना दहा लाखाची सुपारी देऊन प्रियकरावर पिस्तुलातून गोळी झाडल्याचा प्रकार मावळ तालुक्यात घडला. याप्रकरणी दोन सराइत गुन्हेगारासंह तिघांना गुंडाविरोधी पथकाने अटक केले आहे.
यामध्ये ३१ वर्षीय तरुण जखमी झाला आहे. पिस्तुलातून गोळी झाडणारा मुख्य आरोपी अद्याप पसार आहे. याबाबत जखमी तरुणाच्या भावाने शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी तरुणाचे एका आरोपीच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोपींना संशय होता. त्यातून आरोपींनी तरुणाचा खून करण्यासाठी दहा लाखाची सुपारी दिली. त्यानुसार आरोपींनी फिर्यादीच्या भावाच्या मानेवर पिस्तूलने गोळी मारली. यात तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर आरोपी पसार झाले. या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा समांतर तपास गुंडा विरोधी पथक करत होते.
पथकाने संशयितांचा माग काढला. गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने आणि फौजदार समीर लोंढे यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार एका आरोपीला रायगड जिल्ह्यातील माथेरान येथून, तर दोघांना सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील मांढरदेवी येथून ताब्यात घेतले. त्यातील एका आरोपीवर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल आहे. दुसऱ्या आरोपीवर चाकण येथे खून आणि ओशिवारा पोलीस ठाण्यातील शस्त्रप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.
तिघांकडून चार पिस्तूल, पाच काडतुसे जप्त
बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनने तिघांना अटक केली. त्यांच्याकडून चार पिस्तूल आणि पाच काडतुसे जप्त केली आहेत. अटक केलेले आरोपी पोलीस सराईत गुन्हेगार आहेत. ही कारवाई बोडकेवाडी फाटा, हिंजवडी-माण रोडवर करण्यात आली.
प्रविण गुंडेश्वर अंकुश (२१, कात्रज, पुणे), विकी दिपक चव्हाण (२०, हिंजवडी फेस दोन, पुणे), आणि रोहित फुलचंद भालशंकर (२२, जाधवनगर वडगाव बुद्रुक पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस शिपाई अमर राणे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार बोडेकवाडी फाटा येथे पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आठ लाख पाच हजार रुपये किमतीचे चार पिस्तूल आणि पाच जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
