पुणे : नदीकाठ सुधारणा प्रकल्पांतर्गत राजाराम पूल ते वारजे-शिवणे पुलापर्यंत मुठा नदीचा सुमारे ८.२ किलोमीटर परिसर सुशोभित केला जाणार आहे. या मार्गातील एकतानगरी परिसरात पुराचे पाणी जाऊ नये, यासाठी संरक्षित भिंत बांधली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने ४५० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून, लवकरच या कामाची निविदा काढण्यात येणार आहे.

महापालिकेने नदीकाठसुधार योजनेचे काम हाती घेतले आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात संगम पूल ते बंडगार्डन आणि बंडगार्डन ते कल्याणीनगर दरम्यान भागाचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच रामनदी परिसरातील निविदाही काढण्यात आल्या आहेत. आता राजाराम पूल ते वारजे-शिवणे नदीकाठाचा परिसर सुशोभित केला जाणार आहे. त्यासाठी ४५० कोटी रुपयांचा खर्चाचा अंदाज असल्याचे प्रकल्प विभागाचे अधीक्षक अभियंता दिनकर गोजारे यांनी सांगितले.

पावसाळ्यात मुठा नदीला येणाऱ्या पुरामुळे दर वर्षी सिंहगड रस्त्यावरील एकतानगरी परिसरातील लोकवस्तीत पाणी शिरते. येथील इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पुराचे पाणी जात असल्याने पावसाळ्यात रहिवासी आणि प्रशासनाची तारांबळ उडते. येथील पुराची समस्या सोडविण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नदीकाठसुधार योजनेच्या कामाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिनकर गोजारे यांनी स्पष्ट केले.

राजाराम पूल ते हिंगणे दरम्यान नदीकाठी असलेल्या इमारतींमध्ये पुराचे पाणी शिरते. विठ्ठलवाडीजवळील नाला नदीला मिळत असल्याने पुराचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर सीमाभिंत बांधण्यात येणार आहे. तसेच नदीकाठच्या खोलगट भागातील पाणी वाहून नेण्यासाठी डक्टही बांधले जाणार आहेत.

सध्या नदीपात्रात ३० मीटर रुंदीचा चॅनल आहे. या चॅनलच्या भिंती काढून टाकून त्याची रुंदी ९० मीटरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. राजाराम पुलापासून वडगाव येथील महामार्गावरील पुलापासून खडकवासला धरणाच्या दिशेने दोन्ही बाजूंना सुमारे १.४ किलोमीटरपर्यंत या टप्प्यात काम करण्यात येणार असल्याचे गोजारे यांनी सांगितले.

शंभर वर्षांतील पुराचा अभ्यास करून येथील नदीकाठ सुधारणा केली जाणार आहे. यामुळे नदीची वहनक्षमता वाढणार आहे. नदीच्या दोन्ही बाजूंना मिळून चार घाट आहेत. या घाटांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. अधिक जागा उपलब्ध झाल्यास १२ मीटर रुंदीचे पादचारी आणि सायकल मार्गदेखील विकसित केले जाणार आहे. एकतानगरी परिसरात केल्या जाणाऱ्या कामांमुळे खर्चात १५० कोटी रुपये वाढ झाली आहे. आता खर्च सुमारे ४५० कोटी रुपये होण्याचा अंदाज आहे. लवकरच या कामाची निविदा काढण्यात येणार असल्याचे गोजारे यांनी नमूद केले. या प्रकल्पात एकतानगरी येथे संरक्षित भिंत, चार घाटांचे सुशोभीकरण, पादचारी आणि सायकल मार्ग तयार केले जाणार आहेत.