शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाढत्या अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याने या मार्गावर वाहतूक नियंत्रणाची अद्ययावत यंत्रणा उभारणे आणि मार्ग आठपदरी करण्याचे राज्य शासनाने जाहीर केले. राजकीय नेत्याचा मृत्यू झाल्यानंतर मार्गाशी संबंधित सर्वच यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या असल्या तरी यापूर्वीही या मार्गावर अपघात घडल्यानंतर वेळोवेळी योजना जाहीर झाल्या. मात्र, त्या कागदावरच राहिल्याचे वास्तव आहे. अतिवेग, मार्गिकांचे नियम धुडकाविणे, यंत्रणांचे दुर्लक्ष आणि पोलिसांच्या कारवाईत सातत्य नसल्याने हा रस्ता असुरक्षित असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लवकरच ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. उपग्रह आणि ड्रोन कॅमेर यांच्याशी संलग्न ‘इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस) योजना लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. महामार्गावरील अवजड वाहतूक तसेच वाहतूक कोंडीमुळे पडणारा ताण पाहता द्रुतगती मार्ग आठ पदरी करण्याची योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. मेटे यांच्या मृत्यूनंतर अपघातस्थळाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

हेही वाचा : पुणे : विश्रांतवाडीत ‘डीआरडीओ’ संस्थेत बिबट्या

अतिवेग, मार्गिका सोडून वाहने चालविण्याच्या बेदरकार वृत्तीमुळे अपघात घडल्याचे निरीक्षणही अधिकाऱ्यांनी नोंदविले. २००१ मध्ये मुंबई-पुणे शहरांना जोडणारा द्रुतगती मार्ग सुरू झाला. द्रुतगती मार्गामुळे दोन शहरातील अंतर कमी होऊन प्रवासाचा वेळ वाचला. मात्र, गेल्या २२ वर्षांत द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात शेकडो जणांचे बळी गेले आहेत. द्रुतगती मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी आखलेल्या उपायोजना कागदावरच आहेत. अपघात रोखण्यासाठी वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना कामे दिली जातात. या संस्थांकडून अहवालही देण्यात येतो. मात्र, या अहवालातील उपाययोजना कागदावर आहेत. द्रुतगती मार्गावर झालेले बहुतांश अपघात मानवी चुका तसेच अतिवेगामुळे झाले आहेत.

प्रतितास १२० ते १३० किलोमीटर

वाहनांचा वेग ८० ते १०० किलोमीटर प्रतितास असावा, असा नियम आहे. मात्र, वाहनचालक नियम धुडकावून १२० ते २०० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहने चालवितात. भरधाव वाहनांवर महामार्ग पोलिसांकडून स्पीडगनद्वारे कारवाई करण्यात येते. मार्गिका सोडून वाहने चालविल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळते. अवजड वाहनचालक सर्रास मार्गिका सोडून जातात. यंत्रणांकडून दुर्लक्ष होत असल्याने द्रुतगती मार्गावरील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

हेही वाचा : पुण्यात मोबाईल दाखवत राज ठाकरेंनीच मानले मनसेचे आभार, कारण वाचून आश्चर्य वाटेल

द्रुतगती मार्गाला अनेक ठिकाणी तडे

द्रुतगती मार्गावर अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. काही ठिकाणी मार्ग खचला आहे. घाट क्षेत्रात कामे सुरू असताना त्याची माहिती देणारे फलक यंत्रणा वाहनचालकांना दिसेल अशा पद्धतीने लावत नाहीत. कामापासून काही अंतरावर लोखंडी कठडे लावणे गरजेचे आहे. मात्र, घाटक्षेत्रात ज्या ठिकाणी काम सुरू आहे. तेथे कठडे लावले जातात. अशा वेळी वाहनचालक मार्गिका सोडून वाहन पुढे नेतात. त्यामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. महामार्ग पोलिसांच्या कारवाईत सातत्य नसल्याने वाहनचालक सर्रास नियम धुडकावतात. द्रुतगती मार्गावरील अपघातांमागे यंत्रणाचे दुर्लक्ष कारणीभूत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plans to prevent accidents on high speed only on paper ignorance of drivers to rules and systems at mumbai pune express way pune print news tmb 01
First published on: 25-08-2022 at 12:17 IST