राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत स्वीकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवल्याचे छायाचित्र समाजमाध्यमात व्हायरल झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हात अजित पवारांच्या हाती असाच राहिला तर राज्यातील राजकीय चित्र बदलू शकते, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

श्री क्षेत्र देहू येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लोहगांव विमानतळावर आगमन झाले. उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार, विरोधीपक्षनेता देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रशासकीय अधिका-यांनी मोदी यांचे स्वागत केले.

PM Modi Maharashtra Visit Live :पंढरपूरची वारी संधीच्या समानतेचं प्रतिक- नरेंद्र मोदी

“…म्हणून आपले पंतप्रधान खऱ्या अर्थाने वारकरी”; PM मोदींच्या देहू दौऱ्यात फडणवीसांचे उद्गार

त्यावेळी मोदी यांनी अजित पवार यांच्या स्वागताचा स्वीकार करताना त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. त्याचे छायाचित्र समाजमाध्यमातून वेगाने प्रसारित झाले.

ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. पहाटेचा शपथविधीचा कार्यक्रमही झाला होता. मात्र त्यांचे सरकार केवळ ८० तास टिकले होते. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना साथ द्यावी, अशी इच्छा अनेक नेत्यांनीही बोलून दाखविली असून या दोघांच्या एकत्र येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात अजित पवार यांच्या खांद्यावर असाच राहिला तर राज्यातील राजकीय समीकरणे बदलतील, अशी चर्चा या छायाचित्रामुळे सुरू झाली आहे.