पुणे : ‘विमानतळ परिसरातील खासगी मोकळ्या जागांवर कचरा तसेच राडारोडा आहे. अशा जागामालकांना सात दिवसांची नोटीस देऊन त्या तातडीने स्वच्छ कराव्यात. अन्यथा, महापालिका त्या जागा ताब्यात घेईल,’ असा इशारा शनिवारी पुणे महापालिकेने दिला.
लोहगाव विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरातील अनेक भागांत कचरा पडलेला असल्याने तेथे पक्ष्यांचा वावर वाढत असून या पक्ष्यांचा त्रास विमान उड्डाणावेळी आणि उतरवताना होतो. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शनिवारी या जागांची पाहणी करून तेथे स्वच्छतेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे अनिरुद्ध पावसकर, उपायुक्त माधव जगताप, संदीप कदम, प्रशांत ठोंबरे तसेच विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही याबाबत नुकतीच बैठक घेऊन सूचना केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर, ही पाहणी करण्यात आली.
‘विमानतळ परिसरातील मोकळ्या जागांवर कचरा पडलेला असतो. त्या जागा मालकांना नोटीस देऊन सात दिवसांत तेथे स्वच्छता करावी. अन्यथा, महाराष्ट्र महापालिका अधिनियम तरतुदीनुसार या जागा महापालिकेने आरोग्यास धोकादायक परिस्थिती निर्माण केल्याबाबत ताब्यात घ्याव्यात,’ अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.
‘वाघोली येथील भाजी मंडईसह त्या परिसरातील स्वच्छता करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाईल. रस्त्यावर कचरा टाकला जाणार नाही, याकडे लक्ष दिले जावे. प्रसंगी दंडात्मक कारवाईदेखील करावी, अशी सूचना देण्यात आल्या,’ असे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. पुणे कटक मंडळाच्या हद्दीत असलेल्या प्रकल्पांमध्ये उघड्यावर कचरा टाकला जातो. त्यामुळे कचरा व्यवस्थापनाचे नियोजन करण्याासाठी २१ जुलैला कटक मंडळाचे अधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे.
चौकट
कचरा न उचलल्यास दुसऱ्या संस्थेला काम
शहरातील अनेक भागांत नागरिक पैसे देत नसल्याने कचरा गोळा करण्याचे काम करणारे स्वच्छ संस्थेचे कर्मचारी कचरा घेत नसल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. परंतु, नियमानुसार स्वच्छ संस्थेला कोणाचाही कचरा नाकारण्याचा अधिकार नाही. स्वच्छ संस्थेचे कर्मचारी ज्या भागात कचरा गोळा करतात, तेथे उकिरडे तसेच रस्त्यांवर कचरा टाकण्याचे प्रकार आढळून आल्यास त्यांचे तेथील काम काढून घेतले जाईल. तेथे कचरा गोळा करण्यासाठी दुसऱ्या संस्थेला काम दिले जाईल, अशी चर्चा झाल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.