पुणे : हवाई दलाच्या हद्दीतील बेकायदा २४ इमारतींवर कारवाई करून महापालिकेने सुमारे ४८ हजार चौरसमीटर क्षेत्र रिकामे केले. लोहगाव नवीन हद्दीमध्ये हवाई दलाने प्रतिबंधित केलेल्या ९०० मीटरच्या बॉम्बे डंप भागात उभारण्यात आलेल्या इमारतींवर ही कारवाई करण्यात आली.
हवाई दलाच्या हद्दीत झालेल्या बेकायदा बांधकामांचे तातडीने सर्वेक्षण करुन त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी पुणे महापालिकेला दिले आहेत. यानंतर जागे झालेल्या बांधकाम विभागाने या भागातील २४ बेकायदा इमारती पाडून टाकून सुमारे ४८ हजार चौरसमीटर क्षेत्र रिकामे केले. विशेष म्हणजे ही सर्व बांधकामे तीन ते चार मजल्यांपर्यंत पूर्ण झालेली होती. मग इतके दिवस बेकायदा पद्धतीने सुरू असलेली ही बांधकामे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या ‘नजरेला’ का पडली नाहीत, अशी जोरदार चर्चा या परिसरात सुरू झाली आहे.
लोहगाव विमानतळ हे संरक्षण विभागाचे प्रमुख केंद्र आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हे विमानतळ महत्त्वाचे आहे. विमानतळाच्या परिसरात बांधकामे होऊ नयेत, यासाठी केंद्र सरकारची नियमावली आहे. या भागात बेकायदा बांधकामे होत असून, महापालिका त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार उच्च न्यायालयात करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन न्यायालयाने महापालिकेला तातडीने विमानतळ परिसरात झालेल्या बांधकामांचे सर्वेक्षण करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाला जाग आली आणि कारवाईला सुरुवात झाली. या भागातील २४ इमारतींना महपालिकेने नोटीस बजावली होती. त्यावर मंगळवारी धडक कारवाई करून ही बांधकामे पाडून टाकण्यात आली. यामध्ये जेसीबी, जॉ कटर या मशिनचा वापर करण्यात आला आहे. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एम. साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता इरफान शेख, सौरभ खुराड यांच्या सह बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस या कारवाईत सहभागी झाले होते.
हवाई दलाने बंदी घातलेल्या क्षेत्रात बेकायदा बांधकामे करण्यात आल्याचे समोर आले होते. २४ इमारतींना बांधकाम विभागाने नोटीस बजाविली होती. त्यावर कारवाई करून इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. – राजेश बनकर, अधिक्षक अभियंता, बांधकाम विभाग, पुणे महापालिका.