ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. सुहास पळशीकर यांचे प्रतिपादन; ‘अधिक मतदान होणे गरजेचे’

‘उमेदवारांचे तपशील नागरिकांना माहिती नसले तरीही एखाद्याची गुन्हेगारी पाश्र्वभूमी, सांपत्तिक स्थिती, त्यातील वाढ याची कल्पना नागरिकांना असते. मात्र आजपर्यंतचे निष्कर्ष पाहता या मुद्दय़ांवरून मतदान मोठय़ा प्रमाणावर फिरते असे वाटत नाही. मतदारांना काही माहिती नसते हे गृहितक चुकीचे आहे. त्यामुळे मतदान केंद्रांबाहेर उमेदवारांच्या माहितीचे फलक लावण्याच्या निर्णयाचा फारसा परिणाम मतदानावर होणार नाही,’ असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. सुहास पळशीकर यांनी मतदान केंद्राबाहेर उमेदवारांचे तपशील जाहीर करण्याच्या निर्णयाबाबत ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.

उमेदवारांची सांपत्तिक स्थिती, नगरसेवकांना उमेदवारी मिळाली असल्यास त्यांच्या संपत्तीत झालेली वाढ, शिक्षण, गुन्हे दाखल असल्यास त्याचे तपशील अशी माहितीचे फलक मतदान केंद्राबाहेर लावण्यात येणार आहेत. उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. वृत्तपत्रातून जाहिरातींच्या माध्यमातूनही उमेदवारांची माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा प्रत्यक्ष मतदानावर कसा परिणाम होऊ शकेल? याबाबत ‘लोकसत्ता’ने डॉ. पळशीकर यांच्याशी संवाद साधला.

डॉ. पळशीकर म्हणाले, ‘एखाद्या भागातील उमेदवाराकडे नेमकी किती संपत्ती आहे त्याची आकडेवारी मतदारांना माहिती नसेल, तरीही हा श्रीमंत उमेदवार आहे. हा गेल्या काही वर्षांत श्रीमंत झाला आहे, अशी माहिती त्यांना असते. त्याचप्रमाणे गुन्हेगार आहे. कोणते गुन्हे केलेत, त्याची कलमे माहीत नसली तरी अमुक एक उमेदवार गुंड आहे अशी त्याची प्रतिमा झालेली असते. त्याची जाण नागरिकांना असते. तरीही नागरिक मतदान करतात. ते चूक की बरोबर हा मुद्दा वेगळा आहे. मात्र, नागरिकांना काही माहितीच नसते आणि आता नव्याने सगळी माहिती मिळून त्यांचे मत फिरेल हे गृहितक चुकीचे आहे. असेच दुसरे एक गृहितक असते ते म्हणजे निरक्षर किंवा अशिक्षित मतदारांची जागृती करण्याबाबत. मात्र मुळात निरक्षर मतदार हा उमेदवाराचे तपशील कसा वाचणार? गेल्या काही वर्षांपासून मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. ती शहरी किंवा शिक्षित मतदारांमध्ये कमी झाल्याचे दिसते. तेथे या प्रयत्नांमुळे मतदानाचा कौल बदलेल असे वाटत नाही.’

नागरिक घडविण्याचे काम त्यांचे नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मतदारांना उमेदवाराच्या निवडीसाठी थोडाफार पर्याय मिळाला आहे. त्यामुळे एकाच प्रभागात वेगवेगळ्या पक्षांना मते जाण्याचे प्रमाण असेल; मात्र त्याबाबतही उमेदवारांबद्दलचे तपशील मतदान केंद्राबाहेर लावणे हा मुद्दा फारसा परिणाम करणारा ठरेल, असे वाटत नाही. निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक व्हावी हे पाहणे निवडणूक आयोगाचे काम आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी त्यांनी काही प्रयत्न केले तरीही ठीक आहे. मात्र नागरिक घडवण्याचे काम त्यांचे नाही,’ असेही डॉ. पळशीकर म्हणाले.