पुणे : महापालिकेच्या मिळकतकर विभागाने पहिल्या सव्वादोन महिन्यांत तीन हजार २५० कोटीच्या उद्दिष्टापैकी १४०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्यामध्ये यश मिळविले आहे. मात्र असे असले, तरी उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजेत, याचा अभ्यास मिळकतकर विभागाने सुरू केला आहे.

शहरात सद्य:स्थितीत तीन ते चार लाख मिळकतींना महापालिकेकडून कर लावण्यात आलेला नसला, तरी त्यांचा वापर मात्र सुरू आहे. त्यामुळे या मिळकतींचा शोध घेऊन त्यांच्याकडून मिळकतकर घेण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.

महापालिकेच्या हद्दीत दर वर्षी मोठ्या प्रमाणात बांधकामे होतात. त्यांची पाहणी करून मिळकतकर लावला जातो. दर वर्षी शहराचा विस्तार होत असल्याने मिळकतींची संख्यादेखील वाढली आहे. मात्र, तीन ते चार लाख मिळकतींची अद्यापही करआकारणी झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या मिळकती शोधून त्यांना करआकारणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आठ महिन्यांमध्ये किमान एक लाख मिळकती शोधून करआकारणी करण्याचे उद्दिष्ट मिळकतकर विभागाच्या २८ विभागीय निरीक्षकांना देण्यात आले आहे.

महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडून शहरातील निवासी, व्यावसायिक मिळकती, औद्योगिक, तसेच मोकळ्या जागांवर करआकारणी केली जाते. मिळकत बांधून पूर्ण झाल्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने त्याचे भोगवटा पत्र दिलेल्या दिवसापासून त्यावर करआकारणी केली जाते. काही नागरिक अनधिकृत बांधकामे करतात. बांधकाम केल्यानंतर महापालिकेकडून भोगवटा पत्र घेतात. मात्र, त्यानंतरही मिळकतकराची आकारणी करून घेत नाहीत. अशा मिळकतींचा शोध घेऊन मिळकतकर विभाग त्यांच्याकडून मिळकतकर वसूल करते. यासाठी नागरिक स्वत: अर्ज करूनदेखील कर निश्चित करून घेऊ शकतात.

करनिरीक्षकांना आदेश

महापालिकेच्या मिळकतकर विभागाला गेल्या वर्षी २६०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. शहराचा वाढत असलेला विस्तार, जुने वाडे, इमारतींचा केला जाणारा पुनर्विकास यामुळे बांधकामांचे प्रकल्प वाढत आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी यंदा २०२५-२६ मध्ये मिळकतकर विभागाला ३२५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३२ गावांतील मिळकतकराच्या वसुलीचा प्रश्न प्रलंबित आहे. त्याचा फटका उद्दिष्ट गाठताना बसणार आहे. त्यामुळे वापर सुुरू असलेल्या आणि करआकारणी न झालेल्या मिळकतींचा शोध घेण्यास महापालिकेने सुुरुवात केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिळकतकर विभागाने पहिल्या सव्वादोन महिन्यांत १४०० कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्यात यश मिळविले आहे. समाविष्ट गावांतील मिळकतकराला दिलेली स्थगिती उठवावी, यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. मिळकतकर विभागाच्या निरीक्षकांना शहरात सुरू असलेली बांधकामे, वापरातील बदल, कर आकारणीसाठी आलेल्या अर्जावर विशेष लक्ष केंद्रित करून उत्पन्नवाढीसाठी एक लाख मिळकती शोधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. – अविनाश सपकाळ, उपायुक्त, मिळकतकर विभाग, पुणे महापालिका.

गेल्या तीन वर्षांचे हे आहे चित्र

वर्षे – नव्याने आकारणी झालेल्या मिळकती

  • २०२२-२३ – ५४ हजार ५७४
  • २०२३-२४ – ५२ हजार ६३३
  • २०२४-२५ – ४० हजार १५३