पुणे : पीएमपी वाहक महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका प्रवाशाविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हडपसर भागात ही घटना घडली.याबाबत वाहक महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एका प्रवाशा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पीएमपी वाहक आहे. आरोपीने प्रवासी तिकिटावरुन वाहक महिलेशी वाद घालून त्यांना शिवीगाळ केली, तसेच विनयभंग केला. सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच विनयभंग केल्याप्रकरणी प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक शिकलगार तपास करत आहेत.
विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार
विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत एका तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपीची ओळख झाली होती. आरोपीने तरुणीला विवाहाचे आमिष दाखविले होते. विवाहाच्या आमिषाने त्याने तरुणीवर बलात्कार केला. तरुणीने विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याने तरुणीला धमकावले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक शिरसाट तपास करत आहेत.
तरुणीला अश्लील संदेश पाठविणाऱ्याविरुद्ध गुन्हा
तरुणीला अश्लील संदेश पाठविणाऱ्या एकाविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपीने तक्रारदार तरुणीचा समाज माध्यमातील मोबाइल क्रमांक (इन्स्टाग्राम) बदलून तिच्या समाज माध्यमातील खात्यात तांत्रिक फेरफार केले. आरोपीने तरुणीला अश्लील संदेश पाठविण्यास सुरुवात केली. आरोपीच्या त्रासामुळे घाबरलेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक मोरे तपास करत आहेत.