पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) क्षेत्रात ‘हात दाखवा-बस थांबवा’ सेवा सुरू करण्यात आली आहे. आजपासून (मंगळवार) १३४ मार्गांवर ‘पीएमपी’ची ही सेवा उपलब्ध झाली असून, या सेवेमुळे प्रवाशांना स्थानकापर्यंत जाण्याची गरज भासणार नाही.
शहरालगत असणाऱ्या उपनगरांमध्ये विशेषत: ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत झपाट्याने विस्तार आणि विकास होत आहे. स्थानिकांना पायाभूत सुविधा आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असताना पीएमपी प्रशासनाने सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरणावर भर दिला आहे. येथील नागरिकांना शेवटच्या मैलापर्यंत सुलभ सेवा उपलब्ध व्हावी, प्रवासीसंख्या वाढावी, महसूल प्राप्त व्हावा, या उद्देशाने विविध मार्गांवर पीएमपी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.‘‘
पीएमआरडीए’च्या कार्यक्षेत्रात थांब्यांची संख्या मर्यादित असून, वाड्या, ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर, खेड्यापाड्यांवर थांबे नाहीत. या परिसरातील नागरिकांना स्थानकापर्यंत पायपीट करावी लागते. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने ‘हात दाखवा-बस थांबवा’ ही सेवा उपलब्ध करून दिली असून, यातून पीएमपीचा दर्जाही उंचावेल,’ अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी दिली.
ग्रामीण भागातील प्रवाशांना फायदा
सध्या ‘पीएमपीएमएल’ ही पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ‘पीएमआरडीए’ कार्यक्षेत्रात १ हजार ९२२ बसद्वारे ३८८ मार्गांवर नियमित सेवा पुरवते. त्यांपैकी ‘पीएमआरडीए’च्या कार्यक्षेत्रात ५५८ बसद्वारे १३४ मार्गांवर दैनंदिन ५ हजार ५१८ फेऱ्या चालवल्या जातात. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना या सेवेचा अधिकाधिक लाभ घेऊन अपेक्षित ठिकाणी सहज जाता येणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी ‘हात दाखवा-बस थांबवा’ ही सेवा उपलब्ध करून देण्यासाठी चालक, वाहकांना सूचना केल्या आहेत. बस थांबविताना मागून येणाऱ्या आणि इतर वाहनांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याच्या सूचना केल्या आहेत. तसेच, प्रवासीकेंद्री सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ही सेवा या भागात देण्यात येणार आहे. ही सेवा ग्रामीण भागात दिशादर्शक ठरेल. * पंकज देवरे,अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, ‘पीएमपीएमएल’