पुणे : शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी प्रवासीकेंद्री बनविण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वानुसार १७०० स्मार्ट बसथांबे बांधण्याचे धोरण आखले आहे. दिल्लीच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर आधारित हे थांबे असणार आहेत. त्यासाठी ‘पीएमपी’ प्रशासनाचे शिष्टमंडळ पायाभूत सुविधांची पाहणी करण्यासाठी लवकरच दिल्ली येथे जाणार आहे.

‘पीएमपी’ अधिकाधिक सक्षम करून प्रवाशांना सुलभ सेवा देण्याच्या दृष्टीने अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येत असून, संचलनातील मार्गिकांचे फायद्या-तोट्यानुसार विस्तारीकरण, थांब्यांचे नियोजन आणि पुनर्बांधणी या दृष्टीने गेल्या काही दिवसांत पीएमपी प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार ‘बीओटी’ तत्त्वानुसार पीएमपी थांब्यांवर प्रवाशांना पायाभूत सुविधा पुरविण्याचे धोरण आखण्यात आले आहे.

सद्य:स्थितीत पीएमपीच्या ४०० पेक्षा अधिक मार्गांवर सुमारे ७,५०० थांबे आहेत. या थांब्यांवर प्रवाशांना थांबण्याची किंवा बसण्याची सुविधा उपलब्ध नाही. अनेक थांबे अपुरे असून, छत नसल्याने प्रवाशांना ताटकळत पीएमपीची प्रतीक्षा करत थांबावे लागते. अनेकदा थांबा सोडून बस पुढे किंवा मागच्या बाजूला थांबत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. या पार्श्वभूमीवर थांब्यांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.

दिल्लीतील थांब्यांवर महिलांच्या सुरक्षेची व्यवस्था, बसची उद्घोषणा, सीसीटीव्ही आदी सुविधा आहेत. त्याच धर्तीवर ‘बीओटी’च्या माध्यमातून पीएमपीने १७०० थांबे बांधण्याचे धोरण आखले आहे. त्यासाठी ‘पीएमपी’ प्रशासनाचे पथक दिल्लीला अभ्यास दौरा करणार आहे. दरम्यान, पीएमपीच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदी पंकज देवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे अभ्यास दौरा लांबणीवर पडला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वानुसार ‘पीएमपी’चे थांबे स्मार्ट पद्धतीने उभारण्याचे धोरण आहे. पायाभूत सुविधांनी सुसज्ज थांब्यांमुळे चांगली सेवा प्रवाशांना मिळणार आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढण्यास मदत होईल. – दत्तात्रेय झेंडे, व्यावसायिक संचलन विभागप्रमुख, पीएमपीएमएल