पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) सिंहगडासाठीची बससेवा चाचणी अयशस्वी ठरली. अरुंद आणि वळणदार घाट रस्त्यात बसला वळण घेताना अडचणी येत असून, प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे पर्यायी मार्गांची चाचपणी करण्यात येणार आहे.

सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत जाणारे रस्ते दुरुस्त करण्यात आले असून, किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांना सुलभ सेवा उपलब्ध व्हावी म्हणून २०२२ पासून पीएमपीने सेवा सुरू केली. त्यानुसार २ मे ते १६ मे २०२२ या कालावधीत सुमारे ४७ हजार प्रवाशांनी प्रवास केला. खासगी वाहनांची वर्दळ कमी करण्यासाठी पर्यायी योजना म्हणून डोणजे येथे खासगी वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यानुसार इलेक्ट्रिक बसचे संचलन सुरू करण्यात आले. मात्र, या मार्गावरील तीव्र वळणे आणि चढ-उतार, घाट रस्ते यामुळे पीएमपीच्या संचलनात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे पीएमपीने इलेक्ट्रिक आणि सीएनजी बसचे संचलन थांबविले होते.

आता तीन वर्षांनी डिझेलवरील बसची चाचणी घेण्यात आली. मात्र, ही चाचणी अयशस्वी ठरल्याचे पीएमपीचे अभियांत्रिकी विभागाचे मुख्य यांत्रिक अभियंता राजेश कुदळे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘तीव्र वळणांमुळे आणि घाट परिसर असल्याने संचलनात अडचणी येत आहेत. हा मार्ग सुरक्षित नसल्याने पर्यायी मार्गांचा शोध घेण्यात येत आहे.

पर्यटकांना सिंहगडावर पीएमपीची बस सेवा देण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच पर्यायी मार्गावर सेवा सुरू करण्यात येईल.नितीन नार्वेकर,सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी