पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) मारूंजी येथील सहा मजली अनधिकृत इमारतीवर कारवाई करून ती इमारत गुरुवारी जमीनदोस्त करण्यात आली. ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे असल्याच्या आणि काही ठिकाणी बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने प्रशासनाकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने काही दिवसांपूर्वी घेऊन कारवाईही सुरू केली होती. त्यानुसार गुरुवारी मारूंजी परिसरातील सहा मजली इमारतीवर कारवाई करून ती जमीनदोस्त करण्यात आल्याची माहिती पीएमआरडीए प्रशासनाकडून देण्यात आली.
दरम्यान, ‘पीएमआरडीए’ने काही दिवसांपूर्वी अनधिकृत होर्डिंग्ज संदर्भातही सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये त्यापैकी १२२ होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली आहे. वाहतुकीस अडथळे ठरणाऱ्या, तसेच जीविताला धोका निर्माण होईल, अशा होर्डिंग्जवर कारवाई करण्यात येणार असून, हवेली, भोर, मुळशी, पुरंदर, दौंड आदी भागांतील अनधिकृत होर्डिंगवर धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, प्रभारी महानगर आयुक्त दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे, उपजिल्हाधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, प्रमोद कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधिकरणाचे तहसीलदार रवींद्र रांजणे, सचिन म्हस्के, पोलीस निरीक्षक, महेशकुमार सरतापे यांच्यासह स्थानिक बंदोबस्तामध्ये ही कारवाई करण्यात आली.