पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीतील नगर रचना योजनांसाठी भूसंपादन करण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा आणि सहमती मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया राबविण्याचा निर्णय पीएमआरडीए प्रशासनाने घेतला आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तयार केलेल्या चार नगर रचना योजनांना (टाऊन प्लॅनिंग स्कीम- टीपी) राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पीएमआरडीएच्या हद्दीतील गावालगतच्या विकासाला गती मिळणार असून, टीपी स्कीममुळे ६.८ किलोमीटर लांबीचा रिंगरोडचेही विकसन करता येणार आहे. हा रिंग रोडसाठी ६५ मीटर रुंद बाह्यवळण रस्त्यांचे क्षेत्र ताब्यात घ्यावे लागणार आहे. त्यानुसार धामणे, गोदुंबरे, दारूंबरे, साळुंब्रे, सांगवडे या गावांमधील प्रस्तावित नगर रचना योजनेबाबतच्या तरतुदींची माहिती देणे, धोरणात्मक बाबी समजावून सांगणे, नगर रचना योजनेच्या इराद्याबाबत, क्षेत्राबाबत तसेच नकाशाबाबत माहिती देण्यासाठी पीएमआरडीएच्या कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक झाली.
नगररचना विभागाच्या सह महानगर नियोजनकार श्वेता पाटील यांनी सादरीकरणाद्वारे शेतकऱ्यांना टीपी स्कीमबद्दल माहिती दिली. तसेच योजनेची रूपरेषा आणि योजनेची अंमलबजावणीबाबतही सादरीकरण करण्यात आले. या बैठकीला आमदार सुनील शेळके, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, विकास परवानगी आणि नियोजन विभागाचे संचालक अविनाश पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते. या योजनेमध्ये कुठल्याही शेतकऱ्यांचे भूसंपादन करण्यापूर्वी त्यांच्या शंकांचे निरसन आणि समन्वयातूनच पुढील प्रक्रिया राबवणार असल्याची ग्वाही महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिली.
वाहतूक कोंडी सोडवण्याच्या अनुषंगाने शासनाकडून टप्याटप्याने टीपी स्कीम मंजूर होत आहे. याची अंमलबजावणी पीएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असून मावळ तालुक्यातील धामणे, गोदुंबरे, दारुंबरे-साळुंब्रे, दारुंबरे-साळुंब्रे, सांगवडे, नेरे आदी गाव परिसरात या योजनेची आखणी करण्यात येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन त्यांच्या संमतीशिवाय करणार नाही. तसेच शंकांचे पूर्णपणे निरसन झाल्याशिवाय तसेच समन्वयाशिवाय कुठलाही शेतकऱ्यांचे जमिनीचे भूसंपादन होणार नाही, असे डाॅ. म्हसे यांनी जाहीर केले. बाधित होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची संमती घेऊनच पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
आमदार सुनील शेळके यांनी संबंधित टीपी स्कीम राबवताना कुठल्याही शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी सूचना केली. याशिवाय समन्वय आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतरच भूसंपादन प्रक्रियेसाठी पुढे यावे. या टीपी स्कीम योजनेची आखणी निर्धारित वेळेत कशी करता येईल, शेतकऱ्यांना अपेक्षित मोबदला देण्यासंदर्भात तातडीने शासनाकडे पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे शेळके यांनी सांगितले.
पंधरा नव्या टीपी स्कीमसाठी सूचना जाहीर
पीएमआरडीए अंतर्गत ६५ मीटर रुंद वळण रस्त्याचे क्षेत्र मिळविण्यासाठी एकूण १५ टीपी स्कीम घोषित करण्याबाबतची सूचनाही जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये वाघोली, आव्हाळवाडी, मांजरी खुर्द-१ आणि मांजरी खुर्द-२, मांजरी खुर्द-३, हवेली तालुक्यातील वडकी, मुळशी तालुक्यातील माण, धामणे, गोदुंबरे, दारुंबरे- साळुंब्रे १ दारुंबरे-साळुब्रे-२, सांगवडे, नेरे, बावधन बुद्रुक या गावातील नगर योजनांचा समावेश आहे.