पुण्यात आयपीएल क्रिकेट सामन्याचे तिकीट चढ्या दराने विकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुण्याच्या MCA क्रिकेट मैदानावर कोलकाता नाईट रायडर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स हा सामना नुकताच खेळला गेला. तेव्हा, दोन तरुण ‘दस का बिस’ करत चढ्या दराने तिकीट विक्री करत होते. तिकीट खरेदी करणाऱ्या प्रेक्षकाने थेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर तळेगाव पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

बाबासाहेब रामदास आमले आणि शुभम नावाच्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी श्रेयस हनुमंत येलवार यांनी तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “पुण्याच्या MCA क्रिकेट मैदानावर कोलकाता नाईट रायडर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स हा सामना नुकताच खेळला गेला. स्टेडियमच्या आत गेट नंबर तीन येथे दोन तरुण आयपीएल क्रिकेट मॅचच्या तिकिटाचे चढ्या दराने विक्री करत होते.

हेही वाचा : पुणे : विडी कामगारांच्या भूखंडाची परस्पर विल्हेवाट लावून म्हाडाची फसवणूक, आठ जणांवर गुन्हा दाखल

तक्रारदार यांनी तिकीट घेतलं, पण त्यांना मुख्य किंमतीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागले. या प्रकरणी तळेगाव पोलिसात श्रेयस यांनी तक्रार दिली असून फसवणूक केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी, बाबासाहेब रामदास आमले याला पोलिसांनी अटक केली आहे. दुसऱ्या आरोपीचा शोध तळेगाव पोलीस घेत आहेत.