लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : रस्त्यावर उभे राहण्याचा जागेचा मोबदला म्हणून तृतीयपंथीयांकडून एक लाख १२ हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या पाच जणांच्या टोळक्याला पोलिसांनी अटक केली. ही घटना तळेगाव दाभाडे येथे घडली.

उच्चशिक्षित असलेल्या नंदकिशोर उर्फ नंदिनी ज्ञानेश्वर पेढेकर (वय ३०, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश उर्फ बाळा प्रमोद शेडे (वय २७), अमित मुरलीधर पवार (वय २८), अजय महादेव भंडलकर (वय २३), आकाश विजय कुडालकर (वय २०) आणि निशांत बसंतराज गायकवाड (वय २८, सर्व रा. तळेगाव दाभाडे) यांना अटक केली आहे.

आणखी वाचा-शाळकरी मैत्रिणीला भेटण्यासाठी बुरखा घालणे अंगलट; पोलिसांनी तरुणाला पकडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फिर्यादी नंदिनी आणि त्यांच्या दोन मैत्रिणी तळेगावातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) छावणी (कॅम्प) येथील तळ्याजवळ रस्त्याच्या कडेला थांबत होत्या. जानेवारी महिन्यात फिर्यादी मैत्रिणींसह तिथे थांबल्या असताना आरोपी प्रकाश, अमित तिथे आले. फिर्यादींना शिवीगाळ केली. इथे उभे राहायचे असेल तर आम्हाला हप्ता द्यायचा, हा आमचा परिसर आहे, अशी धमकी दिली. त्यांच्याकडून हप्ता घेण्यास सुरुवात केली. तसेच ५ नोव्हेंबर रोजी हप्त्याचे पैसे वाढवून दिले नाही तर बघून घेतो, तुमच्या बापाची जागा नाही, इथे थांबायचे नाही. पैसे दिले तरच इथे थांबायचे अशी धमकी देत अपशब्द वापरले. वारंवार पैशांची मागणी केली. फिर्यादीने घाबरुन भीतीपोटी जानेवारी पासून ५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत एक लाख १२ हजार ५०० रुपये हप्ता स्वरुपात रोख, ऑनलाइन माध्यमातून आरोपींना दिले. फौजदार जगदाळे तपास करत आहेत.