पुणे : कोंढव्यात टोळक्याने दहशत माजवून दुकानाची तोडफोड केल्याची घटना घडली. तीक्ष्ण शस्त्रे उगारून दहशत माजविणाऱ्या तिघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. ऐन दिवाळीत टोळक्याने दुकानाची तोडफोड केल्याने घबराट उडाली.
हामजा खान (वय २०), फिदा खान (वय २०), शाहरूख शेख (वय १८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समीर मोहम्मद युसुफ शेख (वय ४७, रा. मीठानगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर शेख यांचे मीठानगर भागात दुकान आहे. आरोपी खान, शेख आणि साथीदार २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मीठानगर परिसरात आले. आरोपींनी तीक्ष्ण शस्त्रे उगारून दहशत माजविली. परिसरातील दुकानांच्या दरवाज्यावर लाथा मारल्या, तसेच एका चिकन विक्री दुकानाचा एलईडी फलक फोडला. एका भंगार माल दुकानाच्या बाहेर ठेवलेला दूरचित्रवाहिनी संच फोडला. आरोपींनी दहशत माजविल्यामुळे नागरिक घाबरले. दुकानदारांनी त्यांची दुकाने बंद केली. पसार झालेल्या आराेपींना पोलिसांनी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक खराडे तपास करत आहेत.
बोपोडी तरुणाचा खुनाचा प्रयत्न
बोपोडी भागात एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली. दीपक जगदीश कोरी (वय २०, भाऊ पाटील चाळ, बोपोडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. रोहित अमर उबाळे (वय २५, रा. नटराज चौक, बोपोडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत उबाळे याने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उबाळे याची बहीण आणि आरोपीच्या नात्यातील एक तरुणी मैत्रिणी आहेत. आरोपीच्या नात्यातील तरुणीशी एका तरुणाचे प्रेमसंबध होते. याबाबतची माहिती उबाळे याच्या बहिणीला होती. प्रेमसंबंधांची कुणकुण लागल्याने आरोपी कोरी चिडला होता. २० ऑक्टोबर रोजी तो आणि दोन साथीदार उबाळेच्या घरी गेले. आरोपींनी उबाळेच्या बहिणीला मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी उबाळेवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. पसार झालेला आरोपी कोरी याला अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करत आहेत.
