पुणे : विवाहाच्या आमिषाने बिबवेवाडी भागातील एक ज्येष्ठ नागरिकाची साडेअकरा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नागपूरमधील एका तरुणीला पोलिसांनी अटक केली. तरुणीकडून पोलिसांनी रोकड जप्त केली आहे. हर्षला राकेश डेंगळे (वय २८, रा. न्यू ओमनगर,  हुडकेश्वर रोड, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे ना‌व आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांनी एका वृत्तपत्रात विवाह विषयक जाहिरात वाचली होती. या जाहिरातीतील संपर्क क्रमांकावर त्यांनी १८ एप्रिल २०२५ रोजी संपर्क साधला. त्यानंतर ममता जोशी असे नाव आरोपी हर्षला डेंगळेने त्यांना सांगितले. त्यानंतर तिने ज्येष्ठ नागरिकाला जाळ्यात ओढले. ‘तेव्हा कोल्हापूरला आले आहे. माझ्या मावसबहिणीचा अपघात झाला. उपचारासांठी तातडीने पैशांची गरज आहे. पुण्यात परत आल्यानंतर पैसे करते’, असे डेंगळेेने त्यांना सांगितले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून तिने ज्येष्ठ नागरिकाकडून वेळोवेळी अकरा लाख ४७ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने जमा करुन घेतले.

त्यानंतर डेंगळेने वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने १ जून रोजी पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी फसवणूक, तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गु्न्हा दाखल करण्यात आला. बिबवेवाडी पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात आला.

तांत्रिक तपासात आरोपी हर्षला डेंगळेने फसवणूक केल्याचे उघडकीस आले. ती नागपूरमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तिला ताब्यात घेतले. तिच्याकडून तीन मोबाइल संच, तसेच ११ लाख ४५ हजार रुपये जप्त करण्यात आले. अटक करण्यात आल्यानंतर तिला शिवाजीनगर न्यायालयात हजर करुन तिच्याविरुद्ध अराोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालायने तिला जामीन मंजूर केला आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, गुन्हे शाखेचे निरीक्षक सूरज बेंद्रे, पाेलीस कर्मचारी संतोष जाधव, विशाल जाधव, मेधा गायकवाड, प्रतीक करंजे यांनी ही कामागिरी केली.

समाज माध्यमात विवाहाचे आमिष दाखविणाऱ्या जाहिराती, तसेच संदेशाद्वारे फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. विवाहाच्या आमिषाने फसवणूक करणारे संदेश आल्यास  खातरजमा करावी. विवाहेच्छूंनी नावनोंदणी करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. खातरजमा केल्यानंतर वैयक्तिक माहिती संकेतस्थळावर द्यावी. अन्यथा वैयक्तिक माहितीचा गैरवापर करुन फसवणूक केली जाऊ शकते, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.