पिंपरी : गेल्या वर्षी गणपती विसर्जन मिरवणुकीत प्रकाशझोतांचा (लेझर बीम) वापर झाल्याने काही लोकांना आयुष्यभराचे अंधत्व आल्याचे प्रकार घडले असल्याने यंदा प्रकाशझोतांचा वापर करणाऱ्या मंडळांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. गणेश मंडळांनी प्रकाशझोतांचा वापर करु नये, असे आवाहन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव २०२४ चा श्री मोरया पुरस्कार प्रदान सोहळा आणि आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक निगडी येथे बुधवारी झाली. त्यावेळी चौबे बोलत होते. महापालिका आयुक्त शेखर सिंह, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, विवेक पाटील, संदीप आटोळे, बापू बांगर, विशाल गायकवाड, श्वेता खेडकर यावेळी उपस्थित होते. परिमंडळ एकमधून निगडीतील शरयू प्रतिष्ठान, परिमंडळ दोनमध्ये बावधन येथील सिद्धीचा गणपती महिला मंडळ, परिमंडळ तीनमधून चाकणमधील मयूर मित्र मंडळ आणि आयुक्त स्तरावर थेरगावातील विशाल मित्र मंडळाने प्रथम क्रमांक मिळविला आहे.

‘पारंपरिक वाद्यांमुळे आपली संकृती जोपासली जाते. ती जोपासण्याचे काम करावे. यंदा ‘डीजे’चा वापर टाळून पारंपरिक वाद्य वापरावी. गणेशोत्सव साजरा करताना सामाजिक दृष्टीकोन बाळगावा, असे आवाहन पोलीस आयुक्त चौबे यांनी केले.

ऑनलाइन परवानगी

गणेशोत्सव मंडळाला पोलिसांच्या परवानगीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामध्ये गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या माहितीसह मंडप मालक, मंडपाचा आकार याचीही माहिती द्यावी लागणार आहे. परवानगीसाठी मंडळांना धर्मादायक आयुक्तांचे नोंदणी प्रमाणपत्र, मागील वर्षीचे परवानगी पत्र, जागा मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र, वीज जोडणीचे ना-हरकत प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे.

विसर्जन मार्गावरील अडथळे दूर करणार

गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना महापालिका आणि पोलीस आयुक्तांनी उत्तरे दिली. मिरवणूक मार्गात झाडे, विजेचे खांब, वाहने पार्क केली जातात. याबाबत काय उपाययोजना करणार असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ‘गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम राबवून अडथळा ठरणारे विजेचे खांब, वायर काढणे, रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.’

गणेश मंडळांचा परवानगीसाठी जास्त वेळ जाणार नाही. सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळतील. जेवढ्या जागेची आणि अटींची परवानगी दिली आहे त्याचाच वापर करावा. गणेशोत्सव कालावधीत घाटांवर स्वच्छता राखली जाईल. सर्वांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. सारथी संकेतस्थळावर गणेश मंडळांच्या आलेल्या तक्रारी तातडीने सोडविल्या जातील.-शेखर सिंह,आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

विसर्जन मिरवणुकीत प्रकाशझोतांचा वापर होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जाणार आहे. मिरवणूक मार्गावर बेकायदा पार्किंग होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार आहे. पोलीस ठाणे स्तरावर बैठक होणार असून, त्यामध्ये सूक्ष्म नियोजन केले जाणार आहे.- विनयकुमार चौबे,पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड