पुणे : स्वारगेट पोलीस वसाहतीत एका पोलीस शिपायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही.स्वरुप विष्णू जाधव (वय २९ रा. स्वारगेट पोलीस वसाहत) असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई स्वरुप जाधव हे २०२३ मध्ये पुणे पोलीस दलात रूजू झाले. सध्या ते पोलीस मुख्यालयात नियुक्तीस होते. जाधव मूळचे कोल्हापुरचे होते.
स्वारगेट पोलीस वसाहतीतील खोलीत ते दोन मित्रांबरोबर राहत होते. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास त्यांच्या खोलीतून जळाल्यासारखा वास आला. त्यानंतर शेजाऱ्यांनी खोलीत डोकावून पाहिले. तेव्हा त्यांनी टाॅवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी अडीचच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली.
पाेलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. जाधव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी (सुसाईड नाेट) लिहिली नव्हती. त्यांचा मोबाइल संच ‘लाॅक’ असल्याचे निदर्शनास आले. मोबाइल संचाचे लाॅक उघडल्यानंतर आधिक माहिती मिळू शकेल. आत्महत्येमागचे निश्चित कारण समजले नाही, असे पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले.