पुणे : पुणे लोकसभा मतदार संघातील  मतदान सोमवारी होणार आहे. त्या दिवशी शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहर परिसरात पाच हजार पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे दोन हजार जवान, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या तुकड्या, तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या बंदोबस्तास तैनात राहणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्यात  पुण्यातील शांततेत पार पाडणे, तसेच कायदा आणि सु्ुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने पोलीस आयुुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी शहर, तसेच उपनगरातील मतदान केंद्रांच्या परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, नऊ पोलीस उपायुक्त, १७ सहायक आयुक्त, ६४ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, २९६ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, तसेच पाच हजार ५८४ पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे दोन हजार जवान, राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) दोन तुकड्या, केंद्रीय ओैद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) तीन तुकड्या असा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>अमोल कोल्हेंची मागणी प्रशासनाने फेटाळली

पुणे लोकसभा मतदार संघात दोन हजार १८ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी १८५ मतदान केंद्रात पाचपेक्षा जास्त मतदान कक्ष आहेत. वडगाव शेरी, कोथरुड, पर्वती, शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात मतदान केंद्रातील इमारतीत पाचपेक्षा जास्त मतदान कक्ष आहेत. शिरुर लोकसभा मतदार संघातील काही भागाचा समावेश पुणे पोलीस आयुक्तालयात होतो. पुणे पोलिसांकडून पुणे लोकसभा, तसेच शिरुर लोकसभा मतदार संघात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.