पुणे : पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बालेवाडी परिसरात चालणाऱ्या उच्चभ्रू  वेश्या व्यवसायावर छापा टाकून सात राज्यातील दहा मुलींची सुटका केली. पाच दलालांवर पिटा कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच कोरेगाव पार्क परिसरात पोलिसांनी सापळा रचून राजस्थानी अभिनेत्री आणि उझबेकिस्तानच्या दोन तरुणींना ताब्यात घेतले होते.

नदीम, रॉकी कदम, राहुल उर्फ मदन संन्यासी, दिनेश उर्फ मामा आणि रोशन या दलालांवर चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांत शहरातील ऑनलाईन वेश्‍या व्यवसायासंदर्भात पोलिसांकडे तक्रारी वाढल्या होत्या. त्यानुसार माहिती काढली असता, बालेवाडी परिसरात हॉटेल आणि सदनिकांमध्ये वेश्या व्यवसाय चालत होता.

हेही वाचा : अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलविरुद्ध सात हजार पानांचे आरोपपत्र, पाटीलला ससूनमधून बाहेर जाण्यास ‘याने’ केली मदत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामाजिक सुरक्षा विभागाने हॉटेल टॅग हाऊस येथील तीन खोल्यांवर छापा टाकत, पॅनकार्ड क्लब रस्त्यावरील स्नेह अपार्टमेंट आणि लक्ष्मीनगर येथील द विला हॉटेलमध्ये अचानक छापा टाकला. यामध्ये दिल्ली राज्यातील गुडगाव आणि नजबगड, उत्तर प्रदेशातील आझमगड, पश्‍चिम बंगालमधील कोलकत्ता आणि काशिपूर, आसामधील लिखापानी, महाराष्ट्रातील नवी मुंबई, अंधेरी आणि वाशी, गुजरातमधील वापी आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथील तरुणींची सुटका करण्यात आली. या मुलींना अधिक पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्‍या व्यवसाय करुन घेतला जात होता. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.