पिंपरी : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर चिंचवड येथे करण्यात आलेल्या शाईफेक प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणात ११ पोलिसांवर निलंबनाची कारवाईही करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनोज भास्कर गरबडे, धनंजय भाऊसाहेब इजगज, विजय धर्मा ओव्हाळ अशी शनिवारी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पत्रकार गोविंद वाकडे यांना याप्रकरणी चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. नंतर त्यांना सोडून देण्यात आलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड गावात कार्यक्रमासाठी आलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेकण्यात आल्यानंतर आरोपींना घटनास्थळीच अटक करण्यात आली. आरोपींवर खुनाच्या प्रयत्नासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पत्रकार वाकडे हे आंदोलकांच्या सातत्याने संपर्कात होते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे, बंदोबस्तात हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल ११ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. चिंचवड पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, पाटील यांनी ८ डिसेंबरला पैठण येथे झालेल्या एका कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी चिंचवड येथे पाटील यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविण्यात आले होते. त्यांच्या विरोधात फलकही लावण्यात आले होते. त्यानंतर शाईफेकीचा हा प्रकार घडला. पाटील यांच्यासमोर येऊन शाई फेकणाऱ्याला पोलिसांनी घटनास्थळीच अटक केली. मात्र, या प्रकरणात कलम ३०७ अनुसार जिवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने विरोधकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

दिलगिरी व्यक्त करावी – आठवले

मुंबई : उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासनाच्या अनुदानाविना लोकांच्या मदतीने शिक्षण संस्था चालविण्याबाबत वक्तव्य करताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांचे उदाहरण देऊन भीक या शब्दाचा केलेला वापर अत्यंत चुकीचा आहे. सामाजिक क्रांती करणाऱ्या महापुरुषांचा हा अवमान आहे. आम्हाला पाटील यांच्यासारख्या नेत्यांकडून ही अपेक्षा नव्हती. त्यांनी आपले शब्द मागे घेत समाजाप्रति दिलगिरी व्यक्त करावी, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. दलितमुक्तीचा सामाजिक दास्यमुक्तीचा लढा बाबासाहेब आंबेडकरांनी उभारला. त्यांचे जीवन आणि समग्र कार्य हे स्वाभिमानावर आधारलेले आणि स्वाभिमानाची शिकवण देणारे आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी भीक हा केलेला शब्दप्रयोग अत्यंत चुकीचा आहे.

शाई हल्ला पूर्वनियोजित : चंद्रकांत पाटील

दिलगिरी व्यक्त करूनही शाई हल्ला करण्यात आला. लोकशाही पद्धतीने निषेध नोंदविण्यास हरकत नाही. मात्र डोळय़ावर शाई फेकण्याची घटना घटनेच्या कोणत्या चौकटीत बसते, अशी प्रतिक्रिया राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी व्यक्त केली. हल्ला पूर्वनियोजित होता. पडद्याआडून हे कृत्य करणारे हल्लेखोर सापडले आहेत, असेही पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ जामिनावर बाहेर आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असेही पाटील म्हणाले. ‘शाईफेक कित्येकांवर होते, मग हल्लेखोरांना ३०७ हे गंभीर कलम कसे काय लावण्यात आले?’ अशी विचारणाा भुजबळ यांनी केली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police registered attempt to murder charges against four including journalist for throwing ink at minister chandrakant patil zws
First published on: 12-12-2022 at 02:33 IST