scorecardresearch

पिंपरीत मतदार याद्यांमध्ये उघडपणे राजकीय हस्तक्षेप ;  भाजप आमदार उमा खापरे यांचा आरोप

महापालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांना खापरे यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे.

pimpri-chinchwad-PCMC
पिंपरी-चिंचवड महापालिका (संग्रहित छायाचित्र)

पिंपरी: महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या कामात उघडपणे राजकीय हस्तक्षेप झाला असून, निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पक्षपातीपणे कारभार केला आहे, असा आरोप भाजपच्या नवनिर्वाचित आमदार उमा खापरे यांनी केला आहे. मतदारांना हरकती व सूचना दाखल करण्यासाठी आणखी एक महिन्याची मुदतवाढ द्यावी, त्या दरम्यान मतदार याद्यांमध्ये सुधारणा करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

महापालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांना खापरे यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे. राज्य निवडणूक आयोगाने पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ जून २०२२ रोजी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार १ जुलै २०२२ पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत आहे. त्यानंतर, प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या ९ जुलैला प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. हरकती व सूचनांसाठी फक्त आठ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. तो अतिशय अपुरा आहे. आणखी महिनाभर मुदतवाढ द्यावी, अशी मागणी खापरे यांनी केली आहे. मतदार याद्यांबाबत संभ्रमावस्था आहे. याद्या फोडताना प्रशासनाने प्रभागांच्या सीमांचा योग्य प्रकारे विचार केलेला नाही. त्यामुळे सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांनी प्रभागातील मतदार याद्यांबाबत हरकती घेतल्या आहेत. याद्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप झाला असून नियमबाह्य कारभार झाला आहे. याबाबत प्रशासक तथा आयुक्तांकडून योग्य कार्यवाही होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा खापरे यांनी व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Political interference in pimpri voter lists says bjp mla uma khapre zws

ताज्या बातम्या