पुणे : गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांच्या भेटी घेऊन मतपेरणी करणारे राजकीय नेते आणि इच्छुकांनी श्री गणरायाला निरोप देण्यासाठी राजकीय पक्षाची झालर बाजूला ठेवून विसर्जन मिरवणुकीत हजेरी लावली. एरवी आरोपांची चिखलफेक करणाऱ्या राजकारण्यांनी पक्षीय भेदाभेद विसरून एकमेकांची गळाभेट घेऊन, तर कधी कोपरखळ्या मारून मिरवणुकीत रंगत आणली. विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने जमलेल्या या राजकीय गोतावळ्याने आगामी महापालिका निवडणुकीच्या राजकीय वाटचालीचा ‘श्रीगणेशा’ही केला.

विसर्जन मिरवणुकीला मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून आरंभ होताना सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकाच ठिकाणी येत मनातील कटुतेचे विसर्जन केल्याचे चित्र पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंंत्री मुरलीधर मोहोळ, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ या महायुतीतील मित्रपक्षांबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी आमदार मोहन जोशी आदी नेतेही सोहळ्यात सहभागी झाले होते. पवार, पाटील आणि मोहोळ यांनी मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची एकाचवेळी पालखी खांद्यावर घेतली. राजकीय नेत्यांनी एकमेकांच्या गाठीभेटी घेऊन आणि हास्यविनोद करत वातावरण हलकेफुलके केले. मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत सर्वपक्षीय राजकारण्यांनी गर्दी केली होती.

यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त मतपेरणी करण्याचा प्रयत्नही इच्छुकांनी केला. त्यामुळे ही मिरवणूक आगामी महापालिका निवडणुकीची रंगीत तालीम होती. काही नेते एकत्र आले असले, तरी त्यांच्यातील छुपी स्पर्धा स्पष्ट दिसत होती. काहींनी गप्पांच्या ओघात संभाव्य युती-आघाडी आणि राजकीय डावपेचांचीही चर्चा केली. सार्वजनिक व्यासपीठावर तिखट शब्दांचे बाण मारणाऱ्या नेत्यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत मात्र ही कटुता बाजूला ठेवली.

सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांशी बोलताना, आगामी काळात कोणती राजकीय समीकरणे जुळू शकतात, याची चाचपणीही केली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या या राजकीय गोतावळ्याने अनौपचारिक गप्पांमधून पुढील निवडणुकीची रणनीती आणि संभाव्य युती-आघाडीवर चर्चा केली. त्यामुळे एका अर्थाने राजकारण्यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या राजकीय वाटचालीचा ‘श्रीगणेशा’ केला आणि विघ्न दूर होण्यासाठी गणरायाला मनोमन साकडे घातले.

मिसळीवर ताव

मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीला आरंभ झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन मिसळ खाण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यानुसार यंदाही राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन मिसळीवर ताव मारला.

ढोल वाजविण्याचा मोह

विसर्जन मिरवणुकीत ढोल वाजविण्याचा मोह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना आवरता आला नाही. अजित पवार यांनी मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीत ढोल वाजवला. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या श्री साई मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन ढोल वादनाचा आनंद घेतला.