पुणे : ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या (पीओपी) मूर्ती साकारण्यावरील बंदी उठविण्यासंदर्भातील न्यायालयाच्या निकालानंतर शाडू मूर्तीबरोबरच आता ‘पीओपी’ मूर्ती साकारण्याची लगबग सुरू झाली आहे. शाडू मूर्ती साकारण्याच्या तुलनेत कमी कष्टाचे काम असल्याने जवळपास ५० टक्के मूर्तिकारांची पावले पीओपी गणेश मूर्ती साकारण्याकडे वळली आहेत.

गणेशोत्सव यंदा २७ ऑगस्टपासून सुरू होत आहे. त्यामुळे मूर्तिकारांनी मार्च-एप्रिलपासूनच गणेश मूर्ती साकारण्याचा श्रीगणेशा केला होता. आता मूर्ती साकारण्याचे काम पूर्णत्वास गेले असून मूर्ती रंगविण्याच्या कामाची सुरुवात झाली आहे. शाडू मूर्ती हाताने साकारण्यासाठी वेळ देणे महत्त्वाचे असते. त्यानंतर त्या नैसर्गिकपणे वाळविल्या जातात. या वर्षी मे महिन्यापासूनच पावसाने ठाण मांडले असून पावसाळी हवेने मूर्ती वाळण्यासाठीचा कोरडेपणा मिळाला नाही. त्यामुळे रंगविण्याच्या कामाला उशीर झाला असल्याची माहिती प्रसिद्ध मूर्तिकार अभिजित धोंडफळे यांनी दिली.

‘शाडूची मूर्ती जड असते. तसेच, ती वाळायला खूप वेळ जातो. त्यामुळे शाडूपासून मोठ्या मूर्ती बनवल्या जात नाहीत. पुण्यामध्ये बहुतांश मंडळांच्या गणेश मूर्ती या कायमस्वरूपी आहेत. त्यामुळेही मोठ्या मूर्ती साकारल्या जात नाहीत. मात्र, ‘पीओपी’ला न्यायालयानेच बंदी आणल्यामुळे छोट्या कारखानदारांनी गणेश मूर्ती केल्या नाहीत. ‘पीओपी’वर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लक्ष असल्याने त्याचा साठाही कोणत्याही मूर्तिकार व्यावसायिकाला करता आला नाही. आता पीओपीवरची बंदी उच्च न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती साकाण्याला मूर्तिकारांनीही प्राधान्य दिले आहे,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.

शाडू मूर्ती करण्याच्या तुलनेत पीओपीचे काम कमी कष्टाचे आणि लवकर पैसै मिळवून देणारे आहे. त्यामुळे शाडू मूर्ती साकारणाऱ्या जवळपास ५० टक्के मूर्तिकारांची पावले पीओपी गणेश मूर्ती साकारण्याकडे वळली आहेत. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव या कालावधीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची राज्यभरातील उलाढाल ही जवळपास १० हजार कोटी रुपयांची असते. – अभिजित धोंडफळे, प्रसिद्ध मूर्तिकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीओपी मूर्तींचे कृत्रिम हौदातच विसर्जन

पीओपीपासून तयार केलेल्या मूर्तींची विक्री करण्यावर बंदी नसल्याची सुधारित भूमिका केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) नुकतीच उच्च न्यायालयात मांडली. तथापि, पीओपी मूर्तींच्या नैसर्गिक जलस्रोतील विसर्जनाला मनाई कायम राहील, असेही मंडळाने स्पष्ट केले. या मूर्ती कृत्रिम हौदातच विसर्जित करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.