पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर निर्बंध आणखी कडक करायचे किंवा कसे, तसेच शाळा सुरू करण्याबाबत शनिवारी (२२ जानेवारी) होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली करोनाबाबतच्या सद्य:स्थितीची आढावा बैठक विधान भवन येथे होणार आहे. या बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांचे पालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, कृती दल यांसह संबंधित अधिकारी, शहरासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर; तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंध आणखी कडक करायचे किंवा कसे, याबाबत आजच्या बैठकीत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राज्यातील शाळा स्थानिक करोनास्थितीचा आढावा घेऊन सोमवारपासून (२४ जानेवारी) सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार शहरासह जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. गेल्या आठवडय़ात झालेल्या बैठकीत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील जम्बो करोना काळजी केंद्रे सुरू करणे, रुग्णसंख्या वाढल्यास आणखी निर्बंध कडक करण्याबाबत सूतोवाच करण्यात आले होते. राज्य सरकारच्या आदेशानुसार स्थानिक प्रशासनाने निर्बंध लावले आहेत. मात्र, तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने या बैठकीत कोणता निर्णय घेतला जाणार,याबाबत उत्सुकता आहे.