पुणे : शहरी आणि वैद्यकीय सोयी सुविधांपासून दूर असलेल्या भागांमध्ये औषधांचा ड्रोनद्वारे पुरवठा करणे आता शक्य होणार आहे. तब्बल तीन किलो औषधे १० मिनिटांत ११ किलोमीटर अंतरावरील ठिकाणी शीतसाखळीच्या सुविधेसह दुर्गम भागात पोहोचवण्याची चाचणी बुधवारी यशस्वीपणे करण्यात आली.

केईएम रिसर्च सेंटरच्या वढू केंद्राने ड्रोनमध्ये शीतसाखळीसह वजन उचलण्याची क्षमता असलेले तंत्रज्ञान विकसित केले. त्यासाठी व्होलार अल्टा या नवउद्यमी कंपनीशी करार करण्यात आला. संजीवन भारत उपक्रमांतर्गत प्रकल्पाला इंग्लंड सरकारने केलेल्या तब्बल ६० लाख रुपयांच्या निधीमुळे पुणे जिल्ह्यातील अवसरी, निरगुडसर भागात ही चाचणी यशस्वी झाली. या वेळी ब्रिटिश उच्चायुक्तांच्या मुंबई विभागाचे उपायुक्त कॅथरीन बार्नस, वढूच्या केईम रिसर्च सेंटरचे प्रमुख डॉ. संजय जुवेकर, आयसीएमआरच्या साथरोग विभागाचे माजी प्रमुख डॉ. मोहन गुप्ते, शास्त्रज्ञ डॉ. ऋतुजा पाटील, व्होलार अल्टा कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निहारिका कोलते-आळेकर उपस्थित होत्या. अवसरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भागात निरगुडसर, बेलसरवाडी येथे ११ किलोमीटर अंतराच्या कार्यक्षेत्रात औषधे, लस, इंजेक्शन पोहोचविण्याची चाचणी यशस्वी झाली.

डॉ. ऋतुजा पाटील म्हणाल्या,की ड्रोनला कोणते औषध किंवा लस कोणत्या भागात पोहोचवायचे आहे याचे आदेश सॉफ्टवेअरद्वारे देणे शक्य आहे. या औषधांसह लशींचे तापमान राखण्यासाठी शीतसाखळी असलेले ड्रोन वापरण्याविषयीही तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. डॉ. संतोष जुवेकर म्हणाले,की केईएम आणि व्होलर अल्टा यांचा हा प्रयोग संजीवन भारत कार्यक्रम आणि मेक इन इंडिया धोरणांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा आहे. देशातील अतिदुर्गम आणि डोंगराळ, आदिवासी भागात या तंत्रज्ञानाद्वारे औषधे पोहोचवणे शक्य होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.