पुणे : रक्षाबंधनाच्या सणाचे औचित्य लक्षात घेऊन टपाल विभागाने यंदाही विशेष राखी पाकिटांची निर्मिती केली आहे. या पाकिटांच्या उपयोगाने राखी लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे टपाल विभागाकडून सांगण्यात आले आहे. पुणे क्षेत्राचे पोस्ट मास्तर जनरल रामचंद्र जायभाये यांनी याबाबत माहिती दिली आहे.
दर्जेदार कागदापासून या पाकिटांची निर्मिती करण्यात आली आहे. या पाकिटावर पाच रुपयांचा छापील स्टॅम्प असून किंमत दहा रुपये एवढी आहे. डिजिटल संवाद आणि शुभेच्छांच्या काळात प्रत्येक बहिणीने पाठवलेली राखी काळजीपूर्वक तिच्या भावापर्यंत पोहोचवण्यासाठी टपाल विभागाकडून या पाकिटाची निर्मिती करण्यात आली आहे. पोस्ट मास्तर जनरल रामचंद्र जायभाये म्हणाले, दरवर्षी या राखी पाकिटांना प्रचंड मागणी असते. स्पीड पोस्ट सेवेमुळे अगदी परदेशातही जलद आणि वेळेवर राखी पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या पाकिटावर राखी असे लिहिण्यात आल्यामुळे टपाल विभागणी करताना राखी पाकिटे वेगळी करुन पाठवणे सोपे जाते. राख्या पोहोचवण्यात विलंब होऊ नये यासाठी सर्व टपाल कार्यालयांमध्ये स्वतंत्र पेट्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रत्येक पाकिटावर पत्ता, दूरध्वनी क्रमांक, पिन कोड अचुक लिहावा आणि त्या पिनकोडचा उल्लेख असलेल्या पेट्यांमध्येच ही पाकिटे टाकावीत, असेही जायभाये यांनी स्पष्ट केले आहे. पुणे क्षेत्रातील पुणे, अहमदनगर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी या योजना उपलब्ध आहेत.
माय स्टॅम्पची भेट
यंदाच्या रक्षाबंधनाला बहिण-भाऊ एकमेकांना माय स्टॅम्पची भेट देऊ शकणार असल्याचे टपाल खात्याकडून सांगण्यात आले आहे. बहिण किंवा भावाचे छायाचित्र असलेले तिकिट अत्यल्प किंमतीत छापून घेऊन ते परस्परांना भेट म्हणून देण्याची सुविधा टपाल खात्याकडून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पुणे शहरातील प्रमुख टपाल कार्यालयांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे.