लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली असून खड्डेच-खड्डे पडले आहेत. मात्र, महापालिकेने शहरात केवळ ३१९ खड्डे असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविण्याचा पालिकेचा दावा फोल ठरला आहे.

शहरातील निगडी, भोसरी, नवी सांगवी, जुनी सांगवी, वाकड, थेरगाव, चिंचवड, चिखली, आकुर्डी परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. विविध भागात १ जूनपूर्वी ४६७ खड्डे होते. तर, १ जून ते १० जुलैपर्यंत १ हजार ६१९ खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापूर्वीचे आणि नंतर असे शहरात २ हजार ८६ खड्डे होते. यामधील १ हजार ७६७ खड्डे डांबर, कोल्ड मिक्स, मुरूम, खडी, कॉंक्रिट, पेव्हिंग ब्लॉकने बुजविले आहेत. तर, सध्यस्थितीत शहरात केवळ ३१९ खड्डे बुजविण्याचे बाकी असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, शहरातील रस्त्यांवर सर्वत्र खड्डेच-खड्डे दिसून येतात.

आणखी वाचा-पुणे: स्वारगेट चौकात दुचाकी चालकावर गोळीबार, एक जण गंभीर जखमी

काही भागातील खड्डे प्रशासनाने तात्पुरती डागडुजी करत बुजविले आहेत. परंतु, मोठा पाऊस झाल्यास येथे पुन्हा चिखल होणार आणि त्यावरून वाहने गेल्यास पुन्हा खड्डा पडण्याची शक्यता आहे. यामुळे केवळ कागदोपत्री दाखविण्यासाठी ही डागडुजी होत असल्याचा आक्षेप देखील नागरिकांनी घेतला आहे. शहरात २ हजार ८६ खड्डे होते. यापैकी एक हजार ७६७ खड्डे बुजविले. उर्वरित खड्डे बुजविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. पावसाळ्यात खड्डे बुजविण्याची प्रक्रिया निरंतर सुरूच राहणार असल्याचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.

आणखी वाचा- राज्यात पाच दिवस पावसाचा जोर

शहरातील सर्वच भागातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. महापालिका प्रशासन पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविण्यात अपयशी ठरले आहे. पावसाच्या सुरुवातीलाच खड्डे पडल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवावेत. -अमित गावडे, माजी नगरसेवक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर पाणी तुंबणार नाही, याची दक्षता घ्यावी. रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत. प्रभागनिहाय बीट निरीक्षक, अभियंते आणि संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी गस्त घालून पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. -शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका