येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात परिवर्तन अटळ आहे. या निवडणुकीच्या निकालानंतरच राज्याची धुरा कोणाच्या हाती द्यायची त्याचा निर्णय पक्ष घेईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी केले.
 संसदीय कामकाज, वने व पर्यावरण आणि नभोवाणीमंत्री झाल्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे जावडेकर यांचा शनिवारी लोकमंगल कार्यालयात बँकेचे अध्यक्ष एस. मुहनोत यांच्या हस्ते खास सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जावडेकर १९७० ते ८० अशी दहा वर्षे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीस होते. राज्यातील आगामी निवडणुका तसेच लोकसभेचे कामकाज, प्रसार भारतीची स्वायत्तता व भरती प्रक्रिया आदी विषयांवर जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. येणाऱ्या निवडणुकीत राज्यात परिवर्तन अटळ आहे. महाराष्ट्राची धुरा कोणाच्या हाती द्यायची त्याचा निर्णय या निवडणुकीच्या निकालानंतरच पक्ष घेईल, असे त्यांनी या वेळी सांगितले.
लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सोमवारपासून सुरळीत होईल. लोकसभेत सोमवारी रेल्वे अर्थसंकल्पावर आणि नंतर दोन दिवस केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा होईल, असे जावडेकर म्हणाले. प्रसारभारतीची स्वायत्तता कायम ठेवून नवीन भरती प्रक्रिया तसेच नियुक्त्या केल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महत्त्वपूर्ण घटनांची बँक साक्षीदार
बँकेतर्फे आयोजित सत्कार समारंभात बँकेच्या महासिक्युअर या सेवेचे उद्घाटन जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. आयुष्यातील दहा वर्षे मी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये होतो. बँकेच्या सेवेत दहा वर्षे गेल्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्र हे माझे दुसरे घरच आहे. याच काळात माझ्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आणि बँक त्या घटनांची साक्षीदार आहे. ही नोकरी करत असताना सामाजिक काम करण्याची संधी मला मिळाली, असे जावडेकर यांनी बँकेतर्फे आयोजित सत्कार समारंभात सांगितले. बँकेचे अध्यक्ष एस. मुहनोत, कार्यकारी संचालक आर. के. गुप्ता, आर. आत्माराम, माजी अध्यक्ष वसंतराव पटवर्धन तसेच जावडेकर कुटुंबीय आणि बँकेचे कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.