पुणे : स्वारगेट बस स्थानकात महिला अत्याचाराच्या घटनेनंतर दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असताना ९० दिवसांनी त्यातील दोन अधिकाऱ्यांना त्याच ठिकाणी पदस्थापना देण्यात आल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना त्यांच्या पुणे दौऱ्यात समजल्यानंतर त्यांनी तातडीने पावले उचलली. विभाग नियंत्रकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे आणि स्वारगेट स्थानकातील वरिष्ठ-कनिष्ठ आगार व्यवस्थापकांची सायंकाळपर्यंत बदली करण्याचे आदेश त्यांनी दिले.

परिवहनमंत्री सोमवारी पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी दिवसभरात लोणावळा, शिवाजीनगर, स्वारगेट बस स्थानकांमध्ये भेट दिली. या वेळी त्यांनी स्वच्छतागृह, वाहक चालकांसाठी असलेले आरामकक्ष, आणि स्थानकातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रवाशांबरोबर चर्चा करून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सेवा-सुविधांचा आढावा घेतला. यावेळी स्वारगेट स्थानकातील महिला वाहक कर्मचाऱ्यांनी आगार प्रमुखांकडून छळवणूक केली जात आहे, अशी तक्रार केली. सरनाईक यांना गैरप्रकारांचे चित्रिकरणही दाखविल्याने सरनाईक यांनी संतप्त होऊन विभाग नियंत्रक आणि आगार प्रमुखांची खरडपट्टी केली.

सरनाईक म्हणाले, ‘स्वारगेट बस स्थानकात महिलेवरील अत्याचाराची घटना संपूर्ण राज्याला हादरा बसविणारी घटना होती. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही सत्ताधारी आणि विरोधकांकडून याबाबत लक्षवेधी उपस्थित करण्यात आल्या. त्यानुसार संबंधित विभाग नियंत्रक, स्थानकातील अधिकारी, सुरक्षारक्षक यांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. असे असताना निलंबित केलेले वरिष्ठ आणि कनिष्ठ स्थानक प्रमुखांना ९० दिवसानंतर त्याच ठिकाणी पदस्थापना देणे म्हणजे, हा सभागृहाचा तसेच सर्वसामान्य प्रवाशांचा अपमान आहे.’

‘प्रशासनात काम करताना अधिकारी आमचे वैरी नसतात. परंतु, त्यांच्या चुकीच्या कार्यतत्परतेमुळे अशा घटनांना आम्हाला सामोरे जावे लागते. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या कामकाजाबद्दल स्थानकातील कर्मचारी, वाहक, चालकांच्या तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. स्थानकातही गैरसोयी आणि अस्वच्छता आहे. आणखी एक दोन जणांवर कारवाई केल्याशिवाय अधिकाऱ्यांना कळणार नाही,’ अशा शब्दांत एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सज्जड दम भरला.

‘नव्याने ४८ सीसीटीव्ही कॅमेरे लावणार’

‘स्वारगेट बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची यंत्रणा कालबाह्य झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्वारगेट बस स्थानकात कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित ४८ सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे. तसेच, प्रवाशांच्या स्वच्छतागृहांची वेळोवेळी पाहणी करण्यात येणार असून, चालक, वाहक आणि एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या आरामकक्षातील सुविधा सुसज्ज ठेवाव्यात,’ अशा सूचना सरनाईक यांनी यावेळी केल्या.