इंदापूर : सोनाई उद्योगसमूहाचे संचालक आणि पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी-पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती प्रवीण माने यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी इंदापूर तालुक्यातील राजकीय हालचालींना चांगलाच वेग दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार) गेलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यापुढे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा अभ्यास असलेले प्रवीण माने हे गेल्या निवडणुकीत पळसदेव-बिजवडी गटातून विजयी झाले होते. याच गटातून त्यांचे वडील आणि सोनाई उद्योगसमूहाचे प्रमुख दशरथ माने यांनीदेखील प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यामुळे कुटुंबीय पातळीवरचा राजकीय वारसा आणि उद्योगसमूहाच्या माध्यमातून असलेला जनसंपर्क यामुळे माने यांचे प्रभावक्षेत्र भक्कम झाल्याचे बोलले जात आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माने यांनी तालुक्यातील राजकीय हालचालींना चांगलाच वेग दिला आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत माने यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी थेट टक्कर दिली होती. त्या तिरंगी लढतीत तब्बल ३८ हजार मते मिळवून त्यांनी राजकीय अस्तित्व अधोरेखित केले होते. राज्यात सध्या भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे) महायुती असली, तरी प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीची चाचपणी करत आहे. कोणत्याही पक्षाने अद्याप निवडणूक धोरण जाहीर केले नसले, तरी इंदापूर तालुक्यातील हालचालींना वेग आला आहे. यामध्ये माने सक्रिय झाले आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुका भाजपाच्या वतीने सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच निमगाव केतकी येथे झाली. त्यावेळीही पंधरा दिवसांत विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे माने यांनी सांगितले. रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिरे, मोदींच्या आयुष्यावर आधारित प्रदर्शने आणि पुस्तक वितरण, विचारवंतांचा संवाद, विशेष व्यक्तींचा सन्मान आणि मोदी विकास मॅरेथॉन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे माने यांनी स्पष्ट केले.
बैठकीस मयूर पाटील, आकाश कांबळे, गोविंद देवकाते, धनंजय कामठे, ज्ञानेश्वर चवरे, नानासाहेब शेंडे, गजानन वाकसे, प्रवीणकुमार शहा, मनोज पवार, सदानंद शिरदाळे, राजकुमार जठार, राम आसबे, किरण गानबोटे, संतोष चव्हाण, समद सय्यद, सुजाता कुलकर्णी, प्रमिला राखुंडे, माधुरी भराटे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.