लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : आषाढीवारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर संस्थानने जय्यत तयारी केली आहे. पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी, आरोग्य सेवा आणि पावसापासून संरक्षण मिळावे, यासाठी संत तुकाराम महाराज संस्थानने विशेष काळजी घेतली आहे.

जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्या २८ जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर संस्थानने जय्यत तयारी केली आहे. पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे म्हणाले, पालखी सोहळ्यातील चांदीचा रथ, अब्दागिरी यांना पॅालिश करण्यात आले आहे. पालखी सोहळ्यात ३६३ दिंड्यांची नोंद झाली आहे. सोहळ्यातील सर्व दिंडीप्रमुखांना संस्थानने पत्रव्यवहार केला आहे. पालखी मार्गावर भाविकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पाणी, आरोग्य, वीज, रस्ते विभागाला पत्रव्यवहार केला आहे. पालखी मार्गावरील अन्नदानासाठी लागणारे साहित्य खरेदी केले आहे. टाळ, मृदंग, पखवाज, वीणा व पूजेच्या साहित्याची खरेदी करण्यात आली आहे.

आणखी वाचा-किनारपट्टी, पश्चिम घाट परिसरात तीन दिवस पावसाचा जोर

मानकरी, सेवेकरी, दिंडीप्रमुखांना पत्र्यव्यवहार केला आहे. देऊळवाड्यातील स्वच्छतेसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून सुरक्षारक्षकही तैनात करण्यात आले आहेत. विविध विभागांसाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहेत. पिण्याच्या पाण्याचे दहा टँकर उपलब्ध केले आहेत. नळाद्वारे चोवीस तास पाणीपुरवठा राहणार आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. देहूरोड आणि तळवडे या दोन्ही भागांतून चोवीस तास वीजपुरवठा राहणार आहे. महाद्वारातून पालखी प्रस्थानाच्या दिवशी दिंड्यांना प्रवेश देण्यात येणार असून, तपोनिधी नारायण महाराज प्रवेशद्वारातून बाहेर जाण्याचा मार्ग आहे.

आणखी वाचा-पिंपरी: डॉक्टरच्या चारचाकीची रिक्षा, दुचाकीला धडक; तीन जण करकोळ जखमी, गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात

तुकोबारायांच्या पालखीसाठी चेन्नईहून खास छत्री

श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३९ व्या पालखी सोहळ्यासाठी नवी वेलवेटची छत्री बनविण्यात आली आहे. पुण्यातील भवानी पेठ येथील विठ्ठल मंदिराचे सेवेकरी राजेश भुजबळ व त्यांच्या मित्र मंडळींनी चेन्नई येथून तुकोबारायांच्या पालखीवर सावली धरण्यासाठी खास छत्री तयार करून घेतली आहे. ही छत्री भुजबळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी संस्थानकडे सुपूर्द केली. छत्रीवर शंख, चक्र, तिलक (गंध), गरूड, हनुमान यांची चित्र हातकामाने (हातमाग) केलेली आहे. इतर भागात सुरेख नक्षीकाम केलेले आहे. छत्रीसाठी लागणाऱ्या काड्या नैसर्गिक बांबूच्या चिमट्यांपासून बनविलेल्या आहेत. छत्री पकडण्यासाठी आठ फूट उंचीच्या लोखंडी भक्कम पाइपचा वापर करण्यात आला आहे. छत्रीवर पितळी कळस बसविण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. पाच ठिकाणी उपचार केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात आंतर, बाह्य रुग्ण विभाग असणार आहे. दहा रुग्णवाहिका उपलब्ध केल्या आहेत. प्रत्येय दिंडीला प्राथमिक उपचार औषध पेटी दिली जाणार आहे. -डॉ. किशोर यादव, मुख्य वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र देहूगाव