‘नरेंद्र मोदींना आमच्या देशात पाऊल टाकू देणार नाही, अशी भूमिका अमेरिकेने घेतली आहे. अमेरिका अशी भूमिका फक्त आतंकवाद्यांच्या बाबतीतच घेत आली आहे. आता मोदींना काय म्हणायचे तुम्ही ठरवा,’ असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केले.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम यांच्या प्रचारासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात सभा घेतल्या. या वेळी वनमंत्री पतंगराव कदम आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी चव्हाण म्हणाले, ‘गुजरातमध्ये गोध्रा दंगल घडली, तेव्हा मोदी आपल्या एअर कंडिशन ऑफिसमध्ये बसले होते. या दंगलीत अनेक निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागला. मात्र, मोदींनी याबाबत दिलगिरीही व्यक्त केली नाही. त्यांच्या राज्यात खोटी एन्काउंटर्स होतात. अशा व्यक्तीला आमच्या देशात पाऊलही टाकू देणार नाही, अशी भूमिका अमेरिकेने घेतली आहे. आतापर्यंत आतंकवाद्यांच्याच बाबतीत अमेरिका अशी भूमिका घेत आली. आता मोदींना काय म्हणावं हे तुम्ही ठरवा. लोकशाहीची मूल्ये बाजूला ठेवून, सत्तेचा गैरवापर करण्याच्या प्रवृत्तीला विरोध व्हायला हवा.’ गुजरातच्या विकासाबद्दल आमच्या समोर येऊन खुली चर्चा करा असे आव्हान मोदींना देऊन चव्हाण म्हणाले, ‘दहा वर्षांमध्ये महाराष्ट्रात गुजरातपेक्षा ११ पटीने अधिक गुंतवणूक झाली. मात्र, गुजरात मॉडेलचा खोटा प्रचार भाजपकडून करण्यात येत आहे.’
गुजरात महाराष्ट्राच्या पुढे हा प्रचार खोटा – अनंत गाडगीळ
गुजरात महाराष्ट्राच्या पुढे आहे, असा फसवा प्रचार भाजपकडून करण्यात येत आहे, असे सांगून काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले, ‘महाराष्ट्राचा विकास दर हा १४.७ टक्के, तर गुजरातचा ७ टक्के आहे. राज्याचे दरडोई उत्पन्न ७४ हजार, तर गुजरातचे ६३ हजार आहे. औद्योगिक वाढ राज्यात १८.४ टक्के तर गुजरातमध्ये १५.५ टक्के आहे. परकिय गुंतवणुकीत राज्याचा शेअर ३५ टक्के आहे, तर गुजरातचा ६ टक्के आहे.’ मोदींना पंतप्रधान घोषित करणे म्हणजे इतिहास, भूगोल, गणित या विषयात ए.टी.के.टी असलेला पहिला आल्याचे घोषित करण्यासारखे आहे, अशी टीकाही गाडगीळ यांनी मोदींवर केली.
इसमे चव्हाण कौन हैं?
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सभेसाठी बांधलेल्या व्यासपीठावर इतकी गर्दी होती, की सभेला आलेल्या महिलांना यातले नक्की पृथ्वीराज चव्हाण कोण असा प्रश्न पडला. प्रत्येक वक्त्याचे भाषण झाले की ‘ये चव्हाण हैं क्या?’ दिल्लीसे आया हैं? असे प्रश्न एकमेकीला विचारले जात होते.