पुणे : पुणे-सातारा महामार्गावर गुरुवारी दुपारी भोर तालुक्यातील शिंदेवाडी गावाजवळ एका खासगी कंपनीच्या आलिशान (व्होल्व्हो) प्रवासी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. चालकाने प्रसंगावधान दाखविल्यामुळे बसमधील प्रवासी सुखरूप बाहेर पडले.

संपूर्ण बस खाक झाली. या घटनेमुळे महामार्गावर दीर्घ काळ वाहतूककोंडी झाली. अग्निशामक दल आणि पोलीस विभागाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. ही बस साताऱ्यावरून पुण्याच्या दिशेने निघाली होती. दुपारी बाराच्या सुमारास शिंदेवाडीजवळ बस आली असता, बसमधून धूर येताना चालकाला दिसले. धुराचे लोट दिसताच त्याने बस रस्त्याच्या कडेला तत्काळ थांबवली आणि प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या काही प्रवाशांनी बसच्या खिडकीतून तत्काळ उडी मारली. काहींना चालक आणि इतर प्रवाशांनी सुरक्षित बाहेर काढले. प्रवासी बाहेर पडल्यानंतर काही वेळातच संपूर्ण बसला आगीने वेढले. आगीचे कारण अद्याप समोर आले नसून, राजगड पोलिसांचा तपास सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राथमिक अंदाजानुसार, इलेक्ट्रिक शॉर्ट-सर्किट किंवा इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असावी, अशी शक्यता आहे. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. तांत्रिक तपासणीनंतर अधिकृत अहवाल प्रसिद्ध होईल. मात्र, तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांना सूचना देण्यात येतील. – राजेश गवळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राजगड पोलीस ठाणे</p>